कोल्हापूर : राज्यातील सरकार लवकरच कोसळेल : आदित्य ठाकरे | पुढारी

कोल्हापूर : राज्यातील सरकार लवकरच कोसळेल : आदित्य ठाकरे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गद्दारांनी स्थापन केलेले सरकार लवकरच कोसळेल, असा विश्‍वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्‍त केला.

आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर दौर्‍यात शिवसैनिकांशी संवाद साधत मिरजकर तिकटी येथे भर पावसात जाहीर सभा घेतली. शिवसेनेने ‘त्या’ 40 आमदार व 12 खासदारांवर लायकी नसताना विश्‍वास ठेवला. आम्ही डोळे बंद करून त्यांना मिठी मारली. मात्र त्यांनी आमच्या छातीवर नव्हे तर पाठीत खंजीर खुपसला, असे सांगून ठाकरे म्हणाले की, सत्तेत असताना आम्ही विरोधकांच्या मागे यंत्रणा लावली नाही.
ही आमची चूक झाली.

शिवसेना सोडून गेलेल्यांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावे आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देऊन ते म्हणाले की, काही आमदार दबावाने गेले आहेत. त्यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे आजही उघडे आहेत. राजकारण बिघडवले आहे. मात्र सध्याच्या सत्य आणि सत्तेच्या लढाईत सत्याचाच विजय होईल. महाराष्ट्रात अतिवृष्टी होत असताना सरकार राजकारणासाठी कोण फुटतो का हे पाहात आहे. दिल्‍लीवारी करूनही त्यांना तिसरा मंत्री अद्याप मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. रायगड किल्‍ला संवर्धनासाठी त्यांनी 600 कोटींचा निधी दिला. मात्र आज महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार्‍यांचा आवाज दाबला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री कोण आणि खरा मुख्यमंत्री कोण हेच समजत नाही, असे म्हणत त्यांनी मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केल्याचे भाजप नेते सांगतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला.

निधी दिला नाही, अशी ओरड करणार्‍यांना किती निधी दिला याची यादी देण्याची तयारी दाखवत उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली. त्यांना कोरोना झाला असताना दुसरीकडे पक्ष फोडण्याचे षड्यंत्र सुरू होते. मात्र राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले.

कोल्हापूरचे साडेतीन गद्दार

एक अर्धवटराव आणि शिवसैनिकांच्या जीवावर खासदारकी मिळवून भाजपची लाचारी स्वीकारलेल्या कोल्हापूरच्या साडेतीन गद्दारांना गाडायचे आहे. त्यांची लायकी नसताना त्यांना पदे दिली. काहीजण तर नकली धर्मवीर झाले. ते दिल्‍लीची चाटूगिरी करायला गेले. चंद्रकांत पाटील यांना दुश्मन मानणारे आता त्यांना आलिंगन देत आहेत, अशी खरमरीत टीका विनायक राऊत यांनी केली.

यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगले, विशाल देवकुळे यांची भाषणे झाली. जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. सुनील मोदी यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार सुजित मिणचेकर व सत्यजित पाटील, आदेश बांदेकर, आ. वैभव नाईक, आ. राजन साळवी, रविकिरण इंगले, हर्षल सुर्वे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक उपिस्थत होते.

Back to top button