कोल्हापूर : ‘वाट चुकलेल्यां’ना रेल्वेने सावरले! | पुढारी

कोल्हापूर : ‘वाट चुकलेल्यां’ना रेल्वेने सावरले!

कोल्हापूर : अनिल देशमुख : ‘अभ्यास कर म्हणून आई रागावली अन् मी घर सोडलं, काय होईल ते होईल आता या घरात राहायचे नाही, असे ठरवून मी घराबाहेर पडलो. फुकट जाता येते म्हणून रेल्वेने निघालो; पण रेल्वेच्या पोलिसांची नजर माझ्यावर गेली अन् ‘चुकीची वाट’ शोधत चाललेलो मी, पुन्हा माझ्या कुटुंबात परतलो,’ असे एक 14 वर्षीय शाळकरी मुलगा सांगत होता.

गांधीनगर (ता. करवीर) येथील एक अवघ्या आठ वर्षांचा चिमुरडा, घरात वाद झाला म्हणून रेल्वेने थेट पुण्याला निघाला, तिकीट तपासणीस राहुल साळोखे यांच्या नजरेस पडला आणि त्याला पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले. मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ने गेल्या सहा महिन्यांत अशाच प्रकारच्या 745 मुला-मुलींची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

कौटुंबिक वाद, भांडण, परिस्थिती, मोठ्या शहरांचे ग्लॅमर याच्यासह अनैतिक मानवी व्यापार अशा कित्येक कारणांनी घर सोडलेली शेकडो लहान मुले-मुली रेल्वेच्या दररोजच्या लाखो प्रवाशांच्या महासागरात मिसळत असतात. तरीही अशा मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पुन्हा पोहोवण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे कर्मचारी आणि चाईल्ड लाईन यासारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ राबवत असते.

रेल्वेस्थानक, प्लॅटफॉर्म, रेल्वे गाडी आदीत अशी मुले ओळखण्यापासून ते त्यांच्याशी जवळीक साधून, त्यांच्याशी मैत्री करून, सर्व माहिती घेऊन, रेल्वेस्थानकावर असणार्‍या चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अशा बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याची ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, तिकीट तपासणीस यांच्यासह रेल्वे कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जानेवारी ते जून 2022 या सहा महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेने 745 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 490 मुले आणि 255 मुलींचा समावेश आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड अशा प्रमुख स्थानकांचा समावेश असलेल्या मध्य रेल्वे विभागात 136 मुलांची सुटका केली. यामध्ये 98 मुले आणि 38 मुलींचा समावेश आहे.

Back to top button