कोल्हापूर : राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली | पुढारी

कोल्हापूर : राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली

गडहिंग्लज : प्रवीण आजगेकर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खदखदीवर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी धाव घेत कार्यकर्त्यांची मते आजमावली.

या बैठकीत कुपेकरांच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आ. राजेश पाटील हे राष्ट्रवादीमध्ये पक्ष संघटनेऐवजी पाटील गट व कुपेकर गट अशी विभागणी करणार्‍यांना पाठबळ देत असल्याचा थेट आरोप केला. अशीच परिस्थिती राहिली, तर कुपेकर गटाची ताकद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दाखवून देऊ, असा गर्भित इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी नेसरी येथे राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेवेळी या गटा-तटांची नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबतची लेखी माहिती कुपेकर गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाषणातून आ. मुश्रीफ व आ. पाटील यांना ही गटबाजी संपविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही गटबाजी संपली नसल्याने कार्यकर्त्यांनी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या कन्या डॉ. नंदा बाभुळकर यांना कोल्हापूर येथे बोलावून घेत आम्ही काय निर्णय घ्यायचा, अशी विचारणा केली.

यामुळे डॉ. बाभुळकरांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला कुपेकर गटाचे 70 ते 80 कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष या बॅनरखाली काम होण्यापेक्षा गटावरच काम सुरू झाले आहे. साहजिकच, आ. पाटील गट म्हणून कार्यरत असणार्‍या काही कार्यकर्त्यांना आमदारांनी पाठबळ देण्याचे काम सुरू केले; तर कुपेकरांच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. विकासकामे असो अथवा पदाधिकारी निवडी, जाणीवपूर्वक कुपेकरांचे कार्यकर्ते व आ. पाटील गट, अशी वेगळी विभागणी करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर आम्ही कुपेकर गटाचे कार्यकर्ते म्हणून वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

आगामी काळात गडहिंग्लज कारखाना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, बाजार समिती या सर्व ठिकाणी आमच्या ताकदीशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणे शक्य नाही, असा दावा कार्यकर्त्यांनी केला. प्रदेशाध्यक्षांनीच आता यावर तोडगा काढावा, अशी भूमिका घेतली. यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, डॉ. बाभुळकरांना तुम्ही आता मतदारसंघात सक्रिय व्हा, पक्ष बांधणीसाठी काही वेळ द्यावा, अशी सूचना केली. यावर डॉ. बाभुळकर यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या बैठकीतून प्रत्यक्षात तोडगा निघाला नाही.

नाराज कार्यकर्त्यांची घालमेल

आगामी काळात कारखाना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तत्पूर्वी तरी ही गटबाजी संपेल का? गटबाजी संपली नाही तर काय होईल, या विचारातून नाराज कार्यकर्त्यांची घालमेल वाढली असून, विरोधी गटानेही या बैठकीचा धसका घेतला आहे.

Back to top button