शूऽऽऽ कोल्हापूरचे राजकारण सध्या चिडीचूप झाले आहे! | पुढारी

शूऽऽऽ कोल्हापूरचे राजकारण सध्या चिडीचूप झाले आहे!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी : राज्यातील सत्तांतराचे नाट्य, पाठोपाठ जिल्ह्यातील राजकारणाचे बदललेले चित्र आणि सतत परस्परांवर चिखलफेक करण्याची एकही संधी न दवडणार्‍या राजकीय नेत्यांचे मनोमिलन, यामुळे सध्या कोल्हापुरातील राजकारणात चिडीचूप वातावरण आहे. कलगीतुरा थांबला आहे, चिखलफेकही संपल्यासद‍ृश स्थिती आहे आणि बर्‍याच जणांनी राजकारणाचा कानोसा घेत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. शिवाय, ‘ईडी’च्या भीतीने काहींनी तर सध्या मूग गिळणे पसंद केले आहे. अचानक कोलाहल थांबल्याने जनताही आश्‍चर्यचकित झाली असून, कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केव्हा होणार? याची प्रतीक्षा आता कोल्हापूरकरांना लागली आहे.

…अन् ‘बोरीचा बार’ थांबला

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा भाजप अल्पमतात होते आणि भाजपशी संधान साधून असणारेही काहीसे बॅकफूटवर होते. साहजिकच, महाविकास आघाडीतील नेते भाजपवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नव्हते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्रातील सत्तेचा आधार घेत, भाजप नेतेही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पुरेपूर तोंडसुख घेत होते. गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झाले.

शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जसा भाजपच्या छावणीत दाखल झाला, तसे पाठोपाठ कोल्हापुरातही दोन्ही खासदारांसह काही नेत्यांनी महाविकास आघाडीशी काडीमोड घेत शिंदे गटाची वाट पकडली. याखेरीज जे छुपे भाजपवाले होते, त्यांनी उघडपणे आपले भाजपबरोबरचे संबंधही जाहीर केले. या सर्व वातावरणात आता शत्रू मित्र झाले आणि सत्ता राखण्यासाठी मित्रांवर शत्रूच्या छावणीत दाखल होण्याची वेळ आली. या सर्वाचा परिणाम म्हणून कोल्हापूरच्या राजकारणात सध्या ‘बोरीचा बार’ थांबला आहे.

सारेच राजकारण संभ्रमावस्थेत

कोण कोणावर तोफ डागत नाही, चिखलफेक करण्याच्या मानसिकतेत नाही, कोणाला टोला लगावण्याची इच्छाही नाही. सारेच राजकारण संभ्रमावस्थेत आहे. कोण ‘ईडी’च्या भीतीतून तोंड उघडण्याच्या मनःस्थितीत नाही आणि कोणाला राजकारणाचे फासे कसे पडतील, याचा अद्याप अंदाज न आल्याने त्यांनी तोंड बंद ठेवले आहे. प्रतिस्पर्ध्यांवर टीका केल्याशिवाय ज्यांचा दिवसच मावळत नव्हता, असे नेतेच गप्प बसल्याने जनतेतही काही तरी चुकते आहे, अशी भावना दिसते आहे. अर्थात, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत ते पुन्हा शिगेलाही पोहोचेल; पण कोल्हापूरच्या विकासावर केव्हा बोलण्याची सवय करून घेतली, तर भविष्यात कोल्हापूरचे थोडे भले होईल, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.

अब्रूनुकसानीच्या खटल्यांचे काय?

शहराच्या राजकारणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांनी परस्परांविरुद्ध चिखलफेक करण्याची एकही संधी सोडली नव्हती; पण आता क्षीरसागरांच्या फ्लेक्सवर उद्धव ठाकरे यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांची छबी झळकते आहे. मध्यंतरीच्या काळात माजी मंत्री हसन मुश्रीफ बेधडकपणे टीका करीत होते; पण आता बदलत्या राजकारणात मुश्रीफ शांत आहेत. चंद्रदीप नरके यांचे बस्तान कोठे बसणार? याची निश्‍चिती नसल्याने ‘करवीर’चा सुभा थंड पडला आहे. शिरोळमध्ये माजी मंत्री यड्रावकर, खा. धैर्यशील माने हे शिंदे गटात गेल्याने राजू शेट्टी यांची झुंज एकाकी आहे. एकूणच जो तो आपले राजकारण स्थिरस्थावर करण्याच्या नादात असल्याने कोणाचीही टोकाची टीका करण्याची मानसिकता दिसत नाही.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, यातील अनेक परस्परविरोधी नेत्यांच्या जोड्यांनी यापूर्वी एकमेकांवर इतकी टोकाची टीका केली की, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांनी अब्रूचे नुकसान झाले म्हणून न्यायालयात अब्रूनुकसानीचे खटलेही दाखल केले होते. कोट्यवधी रुपयांच्या या दाव्यांची संख्याही तशी कमी नाही. कोल्हापुरात या अब्रूनुकसानीच्या खटल्यांची संख्या बघून नागरिक उपहासाने या खटल्यांच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करा, अशी मागणी करीत होते. आता कोल्हापूरचे राजकीय वातावरण तर थंड झालेच; शिवाय या अब्रूनुकसानीच्या खटल्यांची अवस्थाही टांगणीला लागली आहे.

कट्टर राजकीय शत्रू बनले मित्र

कोल्हापूरच्या राजकारणात खा. धनंजय महाडिक व आ. सतेज पाटील यांच्यातील कलगीतुरा कोल्हापूरच्याच काय, तर महाराष्ट्राच्या जनतेनेही पुरेपूर ऐकला आहे. गेल्या काही वर्षांत आ. सतेज पाटील यांच्या गटामध्ये खा. संजय मंडलिक सोबतीला गेल्यानंतर हा कलगीतुरा अधिकाधिक रंगत गेला होता. आता राजकारणाच्या नव्या चौकटीत मंडलिक-महाडिक यांच्यावर मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर यांचे राजकीय युद्ध असायचे. आता या दोघांतील समेटाने इचलकरंजीचे वातावरण बदलले आहे. कागलच्या राजकारणात छुप्याने का होईना मंडलिक मुश्रीफांची सोबत करत होते आणि मुश्रीफ-घाटगे यांच्यातील कलगीतुरा रंगात आला होता. आता नव्या समीकरणात घाटगे-मंडलिक एका पंक्‍तीला बसणार आहेत.

Back to top button