कोल्हापूर जिल्हा परिषद : खुल्या मतदारसंघांत काटाजोड लढती | पुढारी

कोल्हापूर जिल्हा परिषद : खुल्या मतदारसंघांत काटाजोड लढती

कोल्हापूर : विकास कांबळे : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील मतदारसंघांतून नेत्यांच्या पुढच्या पिढीचे लॉचिंग करण्यात येणार असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या 23 मतदारसंघांत काटाजोड लढती पाहावयास मिळणार आहे. काही मतदारसंघांत घुसखोरी होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही इच्छुकांनी हक्‍काचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे शेजारच्या मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये विद्यमान सदस्यांमध्ये, तर काही मतदारसंघांत आजी-माजी सदस्यांमध्ये लढती रंगणार आहेत.

नेत्यांचे वारसदार उतरणार मैदानात

काही नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीच्या लॉचिंगची तयारी सुरू केली आहे. यामध्ये गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक, अप्पी पाटील यांचे चिरंजीव श्रीशैल, मयूर संघाचे संजय एस. पाटील यांचे चिरंजीव सुशांत, पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांचे चिरंजीव प्रमोद, जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती डी. आर. पाटील यांचे चिरंजीव इंद्रजित, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध आदींचा समावेश आहे.

कसबा सांगामधून राष्ट्रवादीच्या युवराज पाटील यांना पुन्हा संधी?

कागल तालुक्यात कसबा सांगाव, बानगे व कापशी हे मतदारसंघ खुले आहेत. त्यापैकी कसबा सांगावमध्ये राष्ट्रवादीकडून युवराज पाटील हेच मैदानात असणार आहेत. सिद्धनेर्ली मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे अंबरिष घाटगे यांनी आपला मोर्चा बानगे मतदारसंघाकडे वळविला आहे. कापशी मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, उमेश देसाई या स्थानिकांचा समावेश आहे. परंतु, याशिवाय अंबरिषसिंह घाटगे व विरेंद्र मंडलिक हेदेखील या मतदारसंघातून चाचपणी करत आहेत.

शिरोलीत खवरे महाडिक लढत शक्य

हातकणंगले तालुक्यात खुल्या असणार्‍या सर्व मतदारसंघांतून काटाजोड लढती पाहावयास मिळणार आहेत. विद्यमान सदस्या शौमिका महाडिक या शिरोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी हा मतदारसंघ खुला असल्यामुळे पुन्हा त्या निवडणूक रिंगणात उतरू शकतात. त्यांच्या विरोधात लोकनियुक्‍त सरपंच शशिकांत खवरे असणार आहेत. खवरे हे आ. सतेज पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत गाजणार आहे.

कोरोचीत भाजप विरुद्ध भाजप?

कारोची मतदारसंघातून विद्यमान सदस्य प्रसाद खोबरे हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. राहुल आवाडे यांचा मूळचा मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांनी कोरोची मतदारसंघाकडे मोर्चा वळविला आहे. आवाडे व खोबरे दोघेही मूळचे काँग्रेसचे; पण आता दोघेही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे. कबनूर मतदारसंघातून भाजपच्या विजया पाटील दोन वेळा विजयी झाल्या आहेत. यावेळी हा मतदारसंघ सर्वसाधारण खुला आहे. या मतदारसंघातून पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांचे चिरंजीव प्रमोद इच्छुक आहेत.

शिरोळ तालुक्यात भाजप, स्वाभिमानीकडून मोर्चेबांधणी

भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांचा मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांनी नांदणी व अकिवाट या मतदारसंघांत चाचपणी सुरू केली आहे. नांदणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्‍ला आहे. येथून स्वाभिमानीकडून शेखर पाटील व सागर शंभूशेटे इच्छुक आहेत. अकिवाटमधून इकबाल बैरागदार व विशाल चौगुले यांची नावे चर्चेत आहेत. या मतदारसंघातून मयूर संघाचे संजय एस. पाटील यांचे चिरंजीव सुशांत यांचे लाँचिंग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

गारगोटीत भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादीत सामना

भुदरगडमध्ये गारगोटी हा एकमेव मतदारसंघ खुला आहे. देसाई व आबिटकर गट अशी गेल्यावेळी या मतदारसंघात लढत झाली होती. त्यानंतर राहुल देसाई भाजपमध्ये गेले, तर आ. प्रकाश आबिटकर शिंदे गटात सामील झाले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार आहे. माजी आ. के. पी. पाटील यांचाही गट आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चित्र नेतेमंडळीवरच अवलंबून आहे.

राधानगरीत तालुक्यात बहुरंगी लढती रंगणार

राधानगरी तालुक्यातील खुल्या प्रवर्गातील लढती रंगणार आहेत. ठिकपुर्ली मतदारसंघातून विद्यमान सदस्य वंदना जाधव यांचे पती अरुण जाधव हे आ. आबिटकर गटाकडून लढणार आहेत. त्यांच्या विरोधात झेडपीचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, सुशील पाटील-कौलवकर, रविश पाटील, चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक यांचे लाँचिंग या मतदारसंघातून होण्याची शक्यता आहे.

भाटळेतायशेटे लढतीकडे नजरा

राधानगरीत आजी-माजी सदस्यांमध्ये लढत रंगणार आहे. विद्यमान सदस्य सविता भाटळे यांचे पती राजाराम भाटळे व माजी सभापती व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्यात लढत असणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे यांचे पती व राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे, संभाजी आरडे, उत्तम पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. कसबा तारळेमधून विद्यमान सदस्य पांडुरंग भांदिगरे यांच्यासह संजय पाटील, अभिजित पाटील, सुभाष जाधव व संजय कलिकते यांची नावे चर्चेत आहेत.

गडहिंग्लज तालुक्यातही धूमशान

गडहिंग्लजमधील कसबा नूल, भडगाव व गिजवणे मतदारसंघ खुले आहेत. कसबा नूलमध्ये विद्यमान सदस्य अनिता चौगुले यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी आहे. माजी सदस्य शिवप्रसाद तेली, अभिजित पाटील, मारुती राक्षे ही नावे चर्चेत आहेत. भडगाव मतदारसंघातील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. विद्यमान सदस्य राणी खमलेट्टी यांचे पती विजयकुमार हे पुन्हा उमेदवारीसाठी दावेदार आहेत. परंतु, या मतदारसंघातून अप्पी पाटील यांचे चिरंजीव श्रीशैल सक्रिय राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. खमलेट्टीदेखील आप्पी पाटील गटाचे आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठीच त्यांच्यामध्ये चुरस असणार आहे. प्रकाश पताडे, अमर चव्हाण यांचीही नावे चर्चेत आहेत. गिजवणे मतदारसंघातील विद्यमान सदस्य व माजी उपाध्यक्ष सतीश पाटील पुन्हा राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारी आहेत. येथून संजय बटकडली, विठ्ठल पाटील, दिग्विजय कुराडे यांची नावे चर्चेत आहेत.

चंदगडमध्ये पारंपरिक विरोधकच येणार आमने-सामने?

चंदगडमध्ये तुडये व आजरा तालुक्यातील वाटंगी मतदारसंघ खुले आहेत. तुडयेमधून विद्यमान सदस्य विद्या पाटील यांचे पती विलास पाटील तयारीत आहे. या तालुक्यात आ. राजेश पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील आणि गोपाळराव पाटील यांचे गट प्रबळ मानले जातात. माजी सभापती महेश पाटील, दीपक पाटील, शांताराम पाटील आदींचीही नावे चर्चेत आहेत. वाटंगीमधून विद्यमान सदस्य सुनीता रेडेकर यांचे पती रमेश रेडेकर या मतदारसंघातून उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी सभापती विष्णुपंत केसरकर, अल्बर्ट डिझोजा हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध, उत्तम रेडेकर यांचेदेखील नाव चर्चेत आहे.

शाहूवाडी तालुक्यात पेरीडकर, खोत, गायकवाड, बोरगे लढण्याच्या तयारीत

शाहूवाडीतील शित्तूर तर्फ वारुण व बांबवडे हे मतदार संघ खुले आहेत. शित्तूर तर्फ वारुण मतदारसंघातून विद्यमान सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर विरुद्ध माजी सभापती विजय खोत असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. बांबवडे मतदारसंघातून विद्यमान सदस्य विजय बोरगे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात कर्णसिंह गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड हेदेखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत. बोरगे गायकवाड गटाचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मानसिंग गायकवाड यांच्यापुढे मुलाला संधी द्यायची की कार्यकर्त्याला संधी द्यायची, असा प्रश्‍न आहे.

‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये टफ फाईट!

करवीर तालुक्यातील सर्वसाधारण खुले असणारे तिन्ही मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. यावरून या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होते. उजळाईवाडी मतदारसंघातून विद्यमान सदस्य वंदना पाटील यांचे पती विजय पाटील, राजू माने, सुदर्शन खोत हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मुडशिंगीमधून पंचायत सतिमीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, रावसाहेब पाटील, सचिन पाटील, सुदर्शन पाटील यांची नावे काँग्रेसकडून चर्चेत आहेत. त्यांच्या विरोधात महाडिक गटाचे कार्यकर्ते तानाजी पाटील यांच्या एकमेव नावाची चर्चा आहे. शिंगणापूर मतदारसंघातून विद्यमान सदस्य रसिका पाटील याच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचेदेखील नाव या मतदारसंघातून चर्चेत आहे. त्यांच्या विरोधात जि.प.चे माजी सभापती डी. आर. पाटील यांचे चिरंजीव अभिषेक पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. के. एन. पाटील, राजू दिवसे आदी या मतदारसंघातून इच्छुक आहेत.

Back to top button