कोल्हापूर : शिरटी विद्यार्थिनी मृत्यूप्रकरण; ‘त्या’ शिक्षकाला चोप देत परत पाठवले | पुढारी

कोल्हापूर : शिरटी विद्यार्थिनी मृत्यूप्रकरण; 'त्या' शिक्षकाला चोप देत परत पाठवले

शिरटी: पुढारी वृत्तसेवा : शिरटी (ता. शिरोळ) येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या शिरटी हायस्कूलची विद्यार्थिनी सानिका माळी हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेले संशयित वादग्रस्त शिक्षक निलेश प्रधाने हा शुक्रवारी सकाळी शाळेत हजर झाला. प्रधाने शाळेत आल्याची बातमी कळताच गावातील शेकडो ग्रामस्थ शाळेसमोर आले आणि त्या शिक्षकाची चांगलीच धुलाई करून त्याला परत पाठवण्यात आले. त्याच्यासोबत आलेल्या इतर चार युवकांना ही ग्रामस्थांनी चोप दिला. तसेच ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून जोपर्यंत हा वादग्रस्त शिक्षकाचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत शाळा सुरू करणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शिरटी हायस्कूलची विध्यार्थीनी सानिका माळी हिच्या मृत्यूप्रकरणी प्रधाने याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गेल्या वर्षी त्याची जामिनावर सुटका झाली आहे. शाळा न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार तो पुन्हा दि. ८ जुलैरोजी शाळेत हजर झाला आहे. मात्र ग्रामस्थांनी त्याला शाळेत येऊ द्यायचे नाही, असे ठरवून दि.१० जुलैरोजी शाळेवर मोर्चा काढून त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. दरम्यानच्या कालावधीत आजारी असल्याचे कारण दाखवून त्याने संस्थेकडे रजा अर्ज दिला होता.

तो पुन्हा आज सकाळी शाळेत हजर झाल्याचे ग्रामस्थांना कळताच त्याला व त्याच्यासोबत आलेल्या चार युवकांना चोप देऊन परत पाठवण्यात आले. तसेच शाळेला शाळेला कुलूप ठोकण्यात आले आणि गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी शाळेसमोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button