कोल्हापूर : नियमावली पाळूनच घराघरांवर लावा तिरंगा | पुढारी

कोल्हापूर : नियमावली पाळूनच घराघरांवर लावा तिरंगा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राबविण्यात येणार्‍या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमामध्ये घराघरांवर तीन दिवस अहोरात्र तिरंगा फडकणार आहे. यासंदर्भातील नियमावलीही शासनाने जाहीर केली आहे.

शासनाच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट हर घर तिरंगा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 11 ते 17 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. तिरंगा फडकविण्याच्या आणि तो उतरविण्याच्या वेळा निश्चित असतात. त्याचवेळी तो उतरावयाचा असतो.

परंतु सर्वच नागरिकांना नियमावलीची किंवा ध्वज संहितेबद्दल माहिती असेलच असे नाही. त्यामुळे उपक्रमाच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आला आहे. दि. 11 ऐवजी आता 13 ऑगस्ट रोजी नागरिकांंनी आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. तो रात्री न उतरवता तसाच तीन दिवस म्हणजे 15 पर्यंत ठेवण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी हा ध्वज उतरावयाचा आहे.

यासंदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यामार्फत जाणिव जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याासाठी पालक शिक्षक सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. मानवंदनेबाबत पोलिस दलला कृती आराखडा तयार करून विशेष तिरंगा मानवंदना संचलनाचे विविध ठिकाणी आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. एस.टी. बसेस ‘हर घर तिरंगा’ असा संदेश रंगविण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही या उपक्रमाच्या प्रचार व प्रसाराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

तिरंगा वितरण

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, उमेद प्रकल्प कर्मचारी यांच्यावर तिरंगा वितरणाची जबाबदारी आहे.

सहकारी संस्थांची मदत

नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासकीय कार्यालयांना मात्र ध्वजसंहिता कायम

तिरंगा फडकविण्याच्या व उतरण्याच्या वेळा निश्चित असतात. त्या वेळेनुसारच करावे लागते. परंतू हर घर तिरंगा अभियानामध्ये दि. 13 ऑगस्ट रोजी घरावर उभारण्यात येणारा तिंरगा तीन दिवस न उतरता तसाच दि. 15 ऑगस्टपर्यंत ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र शासकीय कार्यालय यातून वगळण्यात आली आहेत. शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र ध्वजसंहिता लागू राहील.

तिरंगा मिळण्याची ठिकाणे

तिरंगा तयार करण्याचे कंत्राट देशपातळीवर काही कंपन्यांना दिले आहे. परंतु स्थानिक पातळीवर देखील तिरंगा उपलब्ध करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. गाव पातळीवर रेशनिंग दुकान, ग्रामपंचायतीमध्ये तिरंगा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी तेथून तो घ्यावयाचा आहे. परंतु त्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. विविध शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Back to top button