गांधी मैदानाचा प्रश्न मार्गी लावू : राजेश क्षीरसागर | पुढारी

गांधी मैदानाचा प्रश्न मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; ऐतिहासिक गांधी मैदान फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले आहेत. या मैदानाची दुरावस्था होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दोन स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

सुमारे २५ कोटींचा निधी अपेक्षित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या मैदानाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधी मंजूर करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. गांधी मैदानाची दुरावस्था आणि आवश्यक उपाययोजना याबाबात श्री शिवाजी तरूण मंडळाच्यावतीने शिवाजी मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी, गेले अनेक वर्षे या मैदानाची दुरावस्था झाली आहे. याबाबत शिवाजी पेठेतील नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. या मैदानास निधी मंजूर व्हावा आणि मैदानाचा वापर पूर्ववत खेळासाठी व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून निधी मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली. तसेच श्रेयवाद करण्यापेक्षा शिवाजी पेठेतील प्रत्त्येक नागरिकाने शिवाजी पेठ म्हणजे मी असा विचार करून शिवाजी पेठेचा लौकिक वाढवावा, असेही सांगितले.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, यापूर्वी रंकाळा तलावा सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाकडून १५ कोटी आणि पर्यटन विभागाकडून ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. गांधी मैदानाच्या प्रश्नाची दाहकता समजून कोल्हापूर महापालिका प्रशासनास प्रत्यक्ष या मैदानाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मैदानात साठणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ८ कोटी आणि गांधी मैदानात प्रेक्षक गॅलरी, वॉकिंग ट्रॅक, पॅव्हेलीयनची सुधारणा, मैदानाची उंची आदी विकासासाठी १७ कोटी असे दोन प्रस्ताव तयार करण्यात आले असून ते शासनाकडे सादर करण्यात आले आहेत, असे सांगितले.

यावेळी श्री शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांना गांधी मैदानाच्या विकासाबाबत निवेदन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुजित चव्हाण, माजी नगरसेवक अजित राऊत, अॅड.ए.वाय.साळोखे माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शिवाजी जाधव, श्रीकांत भोसले पापा, राजेंद्र चव्हाण, सुहास साळोखे, प्रशिक्षक अमर सासणे आदी उपस्थित होते.

Back to top button