पन्हाळगडावर दारूबंदीसाठी शिवप्रेमी आक्रमक | पुढारी

पन्हाळगडावर दारूबंदीसाठी शिवप्रेमी आक्रमक

पन्हाळा ः पुढारी वृत्तसेवा पन्हाळगडावर एका झुणका-भाकर केंद्रात ओली पार्टी रंगल्याने तीव— नाराजी व्यक्‍त होत आहे. मात्र, हा प्रकार घडला नसल्याचे झुणका-भाकर केंद्रांच्या मालकाने सांगितले. दरम्यान, पन्हाळगडावर दारूबंदी करण्यासाठी शिवप्रेमींसह नागरिक रविवारी आक्रमक झाले. त्यांनी धान्याचे कोठार ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मोर्चा काढला. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांसह नगरपालिकेला निवेदन देऊन गड संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

गडावर दारूबंदी झाली पाहिजे, जे घडले ते पूर्णतः चुकीचेच आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबविल्या पाहिजेत, अशी मागणी शिवप्रेमींतून होत आहे. ढासळत असलेल्या पन्हाळ्याच्या संवर्धनासाठी, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षाबाबत शिवप्रेमींनी पन्हाळ्यात पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले. गड संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व पन्हाळा पालिकेला निवेदन देण्यात आले. दरम्यान, पन्हाळा किल्ल्यावरील संवर्धनासाठी अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहे. मजुरी मिळताच काम सुरू करू, असे पुरातत्त्व विभाग, कोल्हापूरचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी सांगितले.

गडकिल्ल्यांवरील अनुचीत प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न : संभाजीराजे
पन्हाळगडावर जो प्रकार घडला, तो निंदनीय आहेच, पण निषेधार्थही आहे. गडावर मोठे पठार असल्याने, गडमाथ्यावर एक गावच वसलेले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, लॉज मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे गडाचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करून अशा प्रकारांचा समूळ नायनाट करावा. मंगळवारी दिल्‍ली येथे गडकोट संवर्धनाच्या बाबतीतच केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका यांच्यासोबत माझी बैठक असून हा विषयही प्रामुख्याने उपस्थित करणार आहे. फोर्ट फेडरेशन व स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यातील गडकोटांवर होणारे असले प्रकार रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे ट्विट माजी खासदार व फोर्ट फेडरेशनचे प्रमुख संभाजीराजे यांनी केले आहे.

Back to top button