इचलकरंजीच्या खेळाडूंचा देशभर डंका..! | पुढारी

इचलकरंजीच्या खेळाडूंचा देशभर डंका..!

इचलकरंजी ; संदीप बिडकर : वस्त्रनगरी जशी कष्टाच्या जोरावर उभी आहे, तशीच ती राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूही घडवित आहे. कबड्डी व खो-खो हा येथील आवडता खेळ. नुकतेच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर अल्टिमेट खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शहरातील तब्बल 22 खेळाडूंचा समावेश झाला आहे. सहा संघांमध्ये या खेळाडूंची निवड झाली. ही स्पर्धा 14 ऑगस्टपासून बालेवाडी (पुणे) येथे होणार आहे.

व्यावसायिक पद्धतीने प्रो-कबड्डी सुरू आहे. यामध्ये खेळाडूंना चांगले पैसे मिळत आहेत. याच धर्तीवर खो-खो हा क्रीडा प्रकारही समाविष्ट करून देशातील तब्बल सहा संघांची टीम तयार करण्यात आली आहे. देशभरातील नामांकित उद्योग समूहांनी या टीमसाठी खेळाडू निवडले आहेत. देशभरातील निवडलेल्या 150 स्पर्धकांपैकी इचलकरंजी शहरातील तब्बल 22 खो-खो खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. इतक्या मोठ्या संख्येने दुसर्‍या कोणत्याही शहरातील खेळाडूंचा समावेश नाही. हे सर्व खेळाडू कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली खेळत होते. आता या खेळाला ग्लॅमर व पैसा मिळणार आहे.

कोल्हापूर खो-खो असोसिएशनने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. सध्या त्यांचे मार्गदर्शन घेणारे सुमारे 1100 खेळाडू खो-खोमध्ये चमकत आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर व त्यांच्या सहकार्‍यांनी खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.

प्रशिक्षक, पंचांमध्येही इचलकरंजी अग्रभागी

कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून पंच परीक्षा पास झालेले शहर परिसरामध्ये सुमारे 125 हून अधिक जण अव्वल गटामध्ये आहेत. त्याचबरोबर 50 जण ऑल इंडिया खो-खो फेडरेशनची पंच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात खो-खो खेळाला समर्पित झालेले क्रीडाप्रेमी फक्त इचलकरंजीतच पाहायला मिळतील.

खो-खो खेळ उत्कंठावर्धक, मनोरंजनात्मक

अल्टिमेट खो-खो या संकल्पनेमध्ये खेळला जाणारा हा खेळ प्रेक्षकांसाठी काहीसा उत्कंठावर्धक व मनोरंजनात्मक करण्यात आला आहे. कारण पारंपरिक खो-खो खेळातील काही नियम बदलून तसेच नवीन नियमानुसार खेळला जाणार आहे. त्यामुळे देशभरातील स्पर्धक प्रो-कबड्डीप्रमाणे याचेही चाहते होतील. चांगले खेळाडू प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होतील. खेळाडूंना चांगले पैसेही या खेळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.

निवड झालेले खेळाडू व त्यांची कॅटेगरी…

ए कॅटेगरी ः 1) अभिजित पाटील, 2) रोहन शिंगाडे, 3) रोहन कोरे, 4) राजवर्धन पाटील, 5) सुशांत हजारे बी कॅटेगरी : 1) सागर पोतदार, 2) नीलेश जाधव, 3) अवधूत पाटील, 4) सौरभ आढावकर, 5) विजय हजारे. सी कॅटेगरी : 1) अभिनंदन पाटील, 2) मझहर जमादार, 3) अमित पाटील, 4) आदर्श मोहिते, 5) मनोज पाटील, 6) शैलेश संकपाळ, 7) अविनाश देसाई, 8) विनायक पोकार्डे. डी कॅटेगरी : 1) सुशांत कलढोणे, 2) प्रसाद पाटील, 3) प्रीतम चौगुले, 4) नीलेश.

Back to top button