पन्हाळा गडावर दारूबंदीसाठी शिवप्रेमी आक्रमक | पुढारी

पन्हाळा गडावर दारूबंदीसाठी शिवप्रेमी आक्रमक

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळगडावर एका झुणका भाकर केंद्रात ओली पार्टी रंगल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर कोल्हापूरसह राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, ज्या झुणका भाकर केंद्रावर हा प्रकार घडला, त्याच्या मालकाने असा काही प्रकार घडला नाही, असा निर्वाळा दिला. सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो जुना कधीचा तरी असावा, असे म्हटले आहे. मात्र, गुरुवारी जे पर्यटक झुणका भाकर खायला आले होते. ते सर्व कुटुंबातील सदस्य होते व परप्रांतीय होते, असेही केंद्र चालकाने सांगितले.

गडावर असे प्रकार होणे पूर्णतः चुकीचेच आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबविल्या पाहिजेत, अशी मागणी शिवप्रेमी जनतेतून होत आहे. पन्हाळ्याच्या संवर्धनाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे, याच्या निषेधार्थ शिवप्रेमी जनतेने आज (दि.२४) पन्हाळ्यात पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच पन्हाळा नगरपालिकेलाही निवेदन दिले.

पन्हाळगडावर एका झुणका भाकर केंद्रात दारू पीत बसलेल्या एका कुटुंबाचा  व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, आज पन्हाळा संवर्धनसाठी व गडावर दारूबंदीबाबत महाराष्ट्रातील विविध शिवप्रेमी संघटना गडावर एकत्र आल्या. यावेळी शिवप्रेमींनी अंबरखाना येथे जमून नंतर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मोर्चाने जाऊन पन्हाळा नगरपालिका व पुरातत्व विभागाला निवेदन दिले.

ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड दुर्लक्षित होत आहे. येथील तटबंदी ढासळत आहे, बुरुज पडताहेत. मात्र, पुरातत्व विभागाचे इकडे लक्ष नाही, पुरातत्व खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याने गडप्रेमी आज पन्हाळा येथे उस्फूर्तपणे एकत्र येत पुरातत्व विभागाचे अधिकारी व पन्हाळा पालिकेला निवेदन दिले. राज्य शासनाने गड किल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. अन्यथा शिवप्रेमी आपल्या पद्धतीने न्याय मागतील, असा इशारा राज्य शासनाला यावेळी देण्यात आला. पन्हाळा किल्ल्यावरील संवर्धनासाठी अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहे. मंजुरी मिळताच काम सुरू करू, असे कोल्हापूर संरक्षण सहायक पुरातत्व विभागाचे विजय चव्हाण यांनी सांगितले.

या आंदोलनात नाशिक, पुणे, परभणी, उस्मानाबाद, नागपूर, मुंबई येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेले मावळे ऐतिहासिक वेषभूषेत सहभागी झाले होते. येथील धान्याचे कोठार ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरपर्यंत मोर्चा काढून शिवप्रेमींनी प्रशासनाला इशारा दिला. शिवप्रेमींनी आज पुरातत्व विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गड किल्ल्याच्या संरक्षणासाठी महामंडळ स्थापन करावे, सर्व किल्यांचे संवर्धन करणे, प्रत्येक गडाच्या नावे ट्रस्ट व्हावेत, त्यामध्ये गड प्रेमींना स्थान द्यावे, गड किल्यावर प्लास्टिक बंदी करावी, गड किल्ल्यावर हिंदू धर्माचा पेहराव असावा, गड किल्यावर चित्रपट चित्रीकरणासाठी बंदी घालण्यात यावी. प्रत्येक गडावर ३६५ दिवस भगवा ध्वज फडकवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button