सांगलीत बीएस्सीचा फिजिकल केमिस्ट्री पेपर फुटला | पुढारी

सांगलीत बीएस्सीचा फिजिकल केमिस्ट्री पेपर फुटला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेंतर्गत शनिवारी बीएस्सी (सीबीसीएस) (भाग 3) चा फिजिकल केमिस्ट्री विषयाचा पेपर सांगली जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर फुटल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पेपर रद्द करून मंगळवारी (दि. 26) घेण्यात येणार आहे.

सध्या विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील परीक्षा सुरू आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वीपासून परीक्षा कशा घ्यायच्या इथपासून ते विद्यार्थी आंदोलनापर्यंत अडचणी सुरू होत्या. परीक्षेच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट अद्याप संपलेले नाही. विद्यार्थ्यांच्या तीव- आंदोलनानंतर विद्यापीठाने ऑफलाईन एमसीक्यू पद‍्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यास महिनाभराचा विलंब लागला.

दरम्यान, शनिवारी बी.एस्सी (सीबीसीएस) भाग 3 सत्र 6 फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर दुपारी 1 वाजता होता. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर भरारी पथक गेले. त्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर एका ठिकाणी उत्तरे लिहीत असल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकाने या प्रकाराची दखल घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्रश्‍नपत्रिका आधीच काही मोबाईलवर व्हाईरल झाल्याचे भरारी पथकास आढळले. पथकाने तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यापीठ प्रशासनास कळविले. त्यानंतर परीक्षा विभागाने पेपर फुटल्याची खातरजमा केली. त्यावेळी चार ते पाच महाविद्यालयांत हा प्रकार घडल्याचे समजले. परीक्षा विभागाने विद्यापीठ प्रशासनास कळविले. त्यानंतर विद्यापीठाने अतितत्काळ संलग्‍नित सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थांना परिपत्रक पाठवले. यात 23 जुलै रोजीचा फिजिकल केमिस्ट्री विषयाचा पेपर आज रद्द केला आहे.

हा पेपर मंगळवारी (दि. 26) दुपारी 4 ते 5 या वेळेत पुन्हा घेतला जाणार आहे. केवळ उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना हा पेपर देता येणार आहे. मात्र, गैरहजर विद्यार्थ्यांना पेपर देता येणार नसल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

 सांगली जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावरील फुटलेला पेपर तत्काळ रद्द केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित महाविद्यालयास या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पेपर फुटीचे प्रकरण परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर प्रमाद समिती दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेईल.
– डॉ. डी. टी. शिर्के,
कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

हेही वाचा

Back to top button