आठ दिवसांत नाईट लँडिंग : खासदार धनंजय महाडिक | पुढारी

आठ दिवसांत नाईट लँडिंग : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळावर येत्या आठ दिवसांत नाईट लँडिंग सुविधा सुरू होईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी दिली. नवी दिल्लीत नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर परवान्यांची आवश्यक ती प्रक्रिया गतिमान झाली. विमानतळावरील नव्या अ‍ॅप्रनला तत्काळ मंजुरी देण्यात आली. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेलाही मान्यता देण्यात आल्याचे सांगत विस्तारित धावपट्टीलाही आठ दिवसांत मंजुरी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

नागरी विमान उड्डाणमंत्री शिंदे यांच्याशी गुरुवारी कोल्हापूर विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. कोल्हापूरहून मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर या महत्त्वाच्या शहरांना नियमित हवाई सेवा सुरू होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि बेंगलोरची विमान सेवा खंडित झाली आहे. ट्रूजेटच्या वतीने कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्यामुळे, तो स्लॉट रिकामा आहे. इंडिगो एअरलाईन्स या मार्गावर सेवा देण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना या मार्गासाठी परवानगी देण्याची मागणी करताच त्याला शिंदे यांनी तत्काळ मान्यता दिली.

कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे, त्याला चांगला प्रतिसाद आहे. ही सेवा दररोज करावी. अलायन्स एअरची कोल्हापूर – बेंगलोर विमान सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी संबधितांना सूचना द्या, अशी मागणी त्यांनी केली. नाईट लँडिंगसाठी कोल्हापूर विमानतळ तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहे. केंद्रीय समितीने पाहणी केली आहे. त्यामुळे नाईट लँडिंग परवाना ताबडतोब द्या. विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1370 मीटर वरून 1930 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या धावपट्टीलाही मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि हवाई सेवा सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलू, अशी ग्वाही देत ना. शिंदे यांनी एकाच वेळी चार विमाने उभी राहणार्‍या अ‍ॅप्रन वापराला मंजुरी दिली. यासह टॅक्सी वे आणि आयसोलेशन वेलाही मंजुरी दिली. कोल्हापूर विमानतळाच्या प्रश्?नांची अडथळ्यांची शर्यत संपली, असे सांगत नाईट लँडिंग व विस्तारित धावपट्टीला आठ दिवसांत मंजुरी मिळेल, असा विश्वास खा. महाडिक यांनी व्यक्त केला.

Back to top button