दोन्ही खासदार गेले... लोकसभेसाठी आता नव्या उमेदवारांची तयारी करा : शरद पवार | पुढारी

दोन्ही खासदार गेले... लोकसभेसाठी आता नव्या उमेदवारांची तयारी करा : शरद पवार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दोन्ही खासदार आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला नवीन उमेदवारांची तयारी केली पहिजे. त्यासाठी आता आपण लक्ष घालावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांना फोवरून दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभेची निवडणूक लढव्ण्यिाची आपली इच्छा नाही; परंतु पक्षाने आदेश दिल्यास तो आपण नाकारू शकत नाही, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याला कोल्हापूर जिल्हाही अपवाद नाही. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात गेले आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीबाबत शरद पवार प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील माहिती घेत आहेत. खचून न जाता कामाला लागण्याच्या सूचना देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते मुश्रीफ यांनाही पवार यांचा फोन आला होता.

जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती समजून घेतल्यानंतर पवार म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात गेले आहेत. सन 2019 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक हे देखील भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे नव्या उमेदवारांची तयारी आपल्याला करावी लागेल. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. खा. संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्यामुळे लोकसभेचे उमेदवार म्हणून आ. मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा लढविण्याची इच्छा

लोकभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फार रस नाही. अजून एक विधानसभेची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा आहे. असे असले तरी पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिल्यास त्याचे मला पालन करावे लागेल, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Back to top button