करवीर तालुक्यातील शिवसेनेवर परिणाम नाही; माजी आ. नरके यांची भूमिका वेट अँड वॉच | पुढारी

करवीर तालुक्यातील शिवसेनेवर परिणाम नाही; माजी आ. नरके यांची भूमिका वेट अँड वॉच

कसबा बावडा; पवन मोहिते : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिंदे गटात ते दाखल झाल्यामुळे त्याचा करवीर तालुक्यातील शिवसेनेच्या मतांवर परिणाम होईल, अशी स्थिती नाही. यावेळी शिवसेनेचे करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका मात्र सध्या वेट अँड वॉच अशीच आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक 2 लाख 70 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. मंडलिक यांना करवीर तालुक्यातून 1 लाख 20 हजार 864 मते मिळाली होती तर विरोधी पराभूत उमेदवार धनंजय महाडिक यांना 84 हजार 54 मते मिळाली होती. मंडलिक यांना करवीरमधून 36 हजार 810 मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य मिळण्यामध्ये आमदार माजी आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार सतेज पाटील यांचे आमचं ठरलंय फॅक्टरचा महत्त्वाचा वाटा होता.

राज्यात गेल्या महिनाभरात अनेक राजकीय उलथापालती झाल्या, यामध्ये शिवसेनेत दुफळी माजली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याने आपलीच शिवसेना खरी असा शिंदे यांनी दावा केला आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारांचा गटही शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाला आहे. यामध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.

करवीर तालुक्यात शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा बलाढ्य गट आहे. तालुक्यात दोन माजी जिल्हा परिषद सदस्य तर चार माजी पंचायत समिती सदस्य होते. शिवसेनेबरोबर या प्रत्येकाची स्वतंत्र ताकदही आपापल्या मतदारसंघात आहे. मंडलिक यांना करवीर तालुक्यातून 1 लाख 20 हजार 864 मते मिळण्यामध्ये शिवसेनेचे तालुक्यातील कार्यकर्ते, आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा मोलाचा हातभार आहे. खासदार संजय मंडलिक यांचा तालुक्यात स्वतंत्र असा गट नाही. त्यामुळे मंडलिक शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाल्यामुळे करवीर तालुक्यातील शिवसेनेवर परिणाम होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

Back to top button