कोल्हापूर : स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे जिल्हा धास्तावला असून कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये यासाठी शासकीय यंत्रणांनी नागरिकांना सजग केले असताना आता जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे संकट ओढवले आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उपचारादरम्यान कसबा बावडा येथील 55 वर्षीय आणि भेंडवडे-सावर्डे (हातकणंगले) येथील 68 वर्षीय वृद्धाचा जीव स्वाईन फ्लूने घेतल्याने आरोग्य विभागाच्या डोळ्यासमोर चांदण्या नाचू लागल्या आहेत. कोरोना, डेंग्यू, चिकुनगुनियानंतर स्वाईन फ्लूचे संकट गडद झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजचे आहे.

स्वाईन फ्लू बाधितांमध्ये 3 पुरुष तर 4 महिलांचा समावेश असून हे रुग्ण मंगळवार पेठ, प्रतिभानगर, पाचगाव, कुंभोज, निपाणी, बासणे (सांगली), रतन मेडिसिटी सेंटर येथील आहेत. हातकणंगले येथील 68 वर्षीय वृद्ध सर्दी, तापाने बेजार झाले होते. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना 24 जून रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. स्वाईन फ्लू सद़ृश लक्षणे असल्याने तपासणी केली असता त्यांचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असतानाच 26 रोजी त्यांचा मृत्यू झाला, तर कसबा बावडा येथील 55 वर्षीय वृद्धास स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याने 26 जून रोजी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता.

1 जुलै रोजी संबंधित वृद्धाचा स्वाईन फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 15 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.

शहरासह ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला आहे. शहरात मंगळवारपेठ, कसबा बावडा, प्रतिभानगर येथे तर पाचगाव, कुंभोज, भेंडवडे येथे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने डोळ्यात तेल घालून या परिसरावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागाला ‘ताप’

कोरोना संसर्गाचा ताप कमी होऊन, डेंग्यू, चिकुनगुनियाच्या तापाने रुग्ण बेजार झाले असताना आता स्वाईन फ्लूच्या तापाची फणफण नागरिकांना जाणवू लागली आहे. जिल्ह्यात अवघ्या पंधरा दिवसांत स्वाईन फ्लूचे 9 रुग्ण सापडले असून या आजाराने दोघांचा जीव घेतला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभाग खडबडला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियाबरोबर आता आरोग्य विभागाला स्वाईन फ्लूचा ‘ताप’ झाला आहे.

Back to top button