कोल्हापूर शहरात तापाची साथ! | पुढारी

कोल्हापूर शहरात तापाची साथ!

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात गेल्या सात महिन्यांत डेंग्यू व चिकुनगुनियाचे तब्बल 113 रुग्ण आढळले आहेत. यात डेंग्यूचे 62 व चिकुनगुनियाचे 51 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात गल्लोगल्ली तापाचे रुग्ण आढळत आहेत. साथीच्या आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने तापाचे रुग्ण आढळणार्‍या ठिकाणी औषध फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरामध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोमवारी 288 घरांची तपासणी करण्यात आली. यात 25 घरांत डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी औषध टाकून त्या अळ्या नष्ट केल्या. 718 कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 28 कंटेनर दूषित आढळले. शिवाजी पेठ, उस्ताद गल्ली, पोलिस लाईन आदीसह इतर ठिकाणी कीटकनाशक विभागाच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले.

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा कोरडी करून स्वच्छ ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. नारळाच्या करवंट्या, न वापरातील डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी. झाडांच्या कुंड्या, फ्रिजच्या मागील ट्रे यामध्ये पाणी साचू देऊ नये. संशयित तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. भागात रक्तनमुने घेण्यासाठी येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Back to top button