कोल्हापूरात मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात निदर्शने | पुढारी

कोल्हापूरात मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात निदर्शने

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: जन आशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा कोल्हापूर येथे निषेध करण्यात आला. याचदरम्यान कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी चौकात कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले .

या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, रविकिरण इंगवले, तुकाराम साळोखे, धनाजी दळवी, किशोर घाटगे, शशिकांत जाधव, सुनील जाधव, राहुल माळी, पीयूष चव्हाण, योगेश चौगले आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नारायण राणेंवर गुन्हा दाखल

केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याविरोधात पुण्यातील चतु:शुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि.२३) रोजी एका झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावरून खालच्या पातळीची टीका केली होती. यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

‘अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही’

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, मी केंद्रीय मंत्री आहे. मी जे बोललो ते गुन्हा नाहीच. आदेश कुठलाही काढू देत तो काही राष्ट्रपती आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहित नाही. तक्रारदार सुधाकर बुडगजरला मी ओळखत नाही. उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात त्यावेळी गुन्हा होत नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : कोल्हापूर : सामाजिक जाणिवेतून अंध बांधवांची आरोग्य तपासणी

Back to top button