कोल्हापूर : पन्हाळा-तांदूळवाडीत डोंगर खचला | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा-तांदूळवाडीत डोंगर खचला

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसामुळे तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथे डोंगर खचला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. गाडीगौंडजवळ कुंभी नदीवर रस्त्याला घालण्यात आलेली संरक्षक भिंतही कोसळल्याने तेथील रस्ता खचला आहे.

तांदूळवाडी हे पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे गाव आहे. येथून पुढे गगनबावडा तालुक्याची हद्द सुरू होते. या परिसरात पाऊस आणि वार्‍याचा मोठा जोर असतो. त्यामुळे विजेचे खांब, झाडे उन्मळून पडतात. तारा तुटतात. परिणामी, गावचा वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाला की, पूर ओसरेपर्यंत गाव अंधारात राहते.

सततच्या पावसाने तांदूळवाडी ग्रामस्थांची झोप उडवली आहे. कुंभी नदीवरील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत आणि घरांच्या पाठीमागील डोंगर खचल्याने नागरिक भयभीत झाले असून, काही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.

तांदूळवाडी गाव डोंगराच्या पायथ्याला वसले आहे. जवळच कुंभी नदी असल्याने पुराचे पाणी लगेचच गावात शिरते. त्यामुळे शेतात घर बांधणेदेखील धोक्याचे आहे. महापुराच्या भीतीने डोंगराशेजारी किंवा डोंगरावर घर बांधले, तर डोंगर खचतोय आणि शिवारात पाणी शिरते, त्यामुळे पावसाळ्यात जायचे कुठे? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.

एस.टी. नाही, मोबाईलला रेंज नाही

तांदूळवाडीची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांतही गावात अद्याप एस.टी. सेवा नाही. तसेच गावात मोबाईललाही नेटवर्क नाही. शिक्षण व नोकरीसाठी साडेतीन ते चार किलोमीटरची पायपीट करत गोटे येथे एस.टी. अथवा वडापसाठी यावे लागते, अशी स्थिती आहे.

Back to top button