कोल्हापूर : पावणेसात लाख घरांवर तिरंगा फडकणार | पुढारी

कोल्हापूर : पावणेसात लाख घरांवर तिरंगा फडकणार

कोल्हापूर ; विकास कांबळे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबविण्यात येणार्‍या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 6,76,969 झेंडे लागणार आहेत. नागरिकांनी हे झेंडे विकत घेऊन आपल्या घरावर लावयाचे आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांमध्ये हे झेंडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या वतीने देशभर ‘हर घर तिरंगा’चा नारा दिला आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शासकीय, निमशासकीय, सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयांबरोबरच प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर दि. 11 ते 17 ऑगस्ट या सात दिवसांच्या कालावधीत तिरंगा फडकवत ठेवायचा आहे.

त्यामुळे शहरातील घरांची संख्या निश्‍चित करण्याची जबाबदारी महानगरपालिका, नगरपालिका यांच्यावर तर ग्रामीण भागातील घरांची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील घरांचे सर्वेक्षण करत हा आकडा निश्‍चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात घरांची संख्या 6,58,328 इतकी आहे.

संस्था तसेच नागरिकांनी तिरंगा स्वच्छेने विकत घ्यावयाचे आहेत. त्यासाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी तिरंगा वॉलेंटियर्स नियुक्‍त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झेंडा संहितेची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे काम गांभीर्याने करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. हा तिरंगा वीस बाय तीस आकाराचा असणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 15 हजार 553 इमारती करवीर तालुक्यात आहेत. सर्वात लहान असलेल्या गगनबावडा तालुक्यात 8 हजार 402 इमारती आहेत.

Back to top button