कबड्डीच्या मैदानातील बादशहा फिरोजची कोरोनाच्या मैदानात हार... | पुढारी

कबड्डीच्या मैदानातील बादशहा फिरोजची कोरोनाच्या मैदानात हार...

पुढारी ऑनलाइन डेस्क : पट्टण कोडोली मागच्या वीस वर्षांत कबड्डीमध्ये जिल्ह्यातच नाहीतर राज्यभरात गाजत आहे. या टीमचा एक सदस्य कबड्डीपटू फिरोज डिगावडे यांचे कोरोनाने निधन झालं. प्रचंड मेहनत करत त्यांनी पट्टण कोडोलीत कबड्डी संघ तयार केला. याच जोरावर गावचं नाव जिल्ह्यात केलं.

दरम्यान चांदी उद्योजक कबड्डीपटू फिरोज मुल्ला (डिगावडे) यांचं कोरोनाने निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली. फिरोज भैय्यांच्या तालमीत तयार झालेला आणि सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सूरज रोंगेने त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

एक आठवडा झाला. जीवन-मरणाची रेषा शिवताना शर्थीचे प्रयत्न केले. निकराची झुंज दिली. पण, कोरोना विषाणूची मजबूत पकड भैय्याला भेदता आली नाही. यावेळी ही मॅच कोरोनाने जिंकली. आपला लाडका फिरोज भैय्या हरला.

आपली पोरं देशासाठी खेळायला पाहिजेत…

व्यवसायाने चांदी कारागीर असणाऱ्या भैय्याची ‘कब्बडीपटू’ हीच आयडेंटी कायम राहिली. आपली पोरं शालेय, कुमार, तालुका, स्टेट-नॅशनलसोबतच प्रो-कबड्डी आणि देशासाठी खेळायला पाहिजेत, अशी फिरोज भैयाची इच्छा होती.

आम्ही आवड म्हणून खेळलो; आताच्या नव्या पोरांनी करिअर घडवायला म्हणून खेळांकडे वळायला हवं. आर्मी, रेल्वे, पोलीस, आयकरमध्ये स्पोर्ट कोट्यातून नोकरीच्या संधी असतात. त्याचा उपयोग करून घ्यावा, अशी भैय्याची अगदी प्रामाणिक भावना होती. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.

यातूनच अलीकडच्या तीन-चार वर्षात आपल्या जोडीदारांसोबत मुलींची कबड्डी टीम तयार केली. त्यांना अनुभवाच्या आधारे योग्य आणि अचूक प्रशिक्षण दिलं. आज कोल्हापूरचं नाव या पोरी राज्यात नव्हे तर देशात गाजवत असताना आपण सगळे बघत आहोत. ही यशोपताका आणखी फडकत असताना फिरोज भैय्या आपल्यात असणार नाही, ही गोष्ट अत्यंत दुःखद आहे.

अहंकाराचा लवलेशही नव्हता….

फिरोज भैय्या म्हणजे एकदम दिलखुलास माणूस. त्याच्याठायी अहंकाराचा लवलेशही नव्हता. म्हणून तर लहानथोर अगदी कुणीही असो, त्यांना “ए फिरोज भैय्या” म्हणून हाक मारू शकत असे. कुमार वयात पैलवानकी केलेल्या भैय्याची तब्येत कायम दणदणीत राहिली.

प्रत्येकाची विचारपूस आणि चेष्टामस्करी करत, जागोजागी स्टॉप घेत सकाळी घर ते कंपनी हे फक्त २०० मीटर जायला भैय्याला अर्धा तास लागे. कायम हसत मज्जा करत असणारा, या जगातला सगळ्यात टेन्शन फ्री माणूस म्हणजे फिरोज भैय्या होता.

अजून बरंच काय बाकी आहे भैय्या..!

व्यक्तीश: माझे आणि फिरोज भैय्यांचे खूप चांगले संबंध होते. आम्ही दोघेही एकमेकांना “ओ नेते” म्हणून बोलवायचो. चौकात गणपतीला कोल्हापूरचा सेट लावायचायं. शाळेच्या पटांगणात क्रीडा संकुल करायचंय. युवक संघटनेवर लेख लिहायचायं. झेडपी आणि पंचायतीच्या निवडणुकांवर तास तासभर बोलत बसायचंय. बेबो-तनू यांना नॅशनल करायचंय. अजून बरंच काय बाकी आहे भैय्या..! हातात घेतलेल्या कामाचा पट्टा पाडणारे भैय्या..! हे असं सगळं अर्ध्यात सोडून जाणं आज आम्हाला मंजूर नाही.

मित्रानो, आपण कोरोनायोद्धा होऊन ‘पुण्य’ करू शकलो असेल किंवा नसेल. पण कोरोनादूत (वाहक) बनण्याचं ‘पाप’ आपल्या हातून घडणार नाही, याची जबाबदारी आजपासून आपल्या सर्वांवर आहे. गर्दी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना फाटा देऊया.

लवकरात लवकर लसीकरण करून घेऊया. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळूया. संभाव्य तिसऱ्या लाटेला वेशीवरच थोपवूया. हीच आज फिरोज भैय्याला खरी श्रद्धांजली असेल. आपल्या अशा अनेक भैय्यांना मुकणे, आपल्याला कधीच परवडणारे नाही.

कबड्डीवर नितांत श्रद्धा…

कबड्डीवर नितांत श्रद्धा असणारे, आमचे मार्गदर्शक व मित्र, उमदे व्यक्तिमत्व “श्री. फिरोज महंमद मुल्ला (डिगवाडे)” यांना विनम्र अभिवादन-भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर डिगवाडे कुटुंबियांना या संकटातून सावरण्याची शक्ती देवो, यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

जीते जी तू हमारा ही था..
जाते वक्त भी हक अदा कर गया.!!!

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र

Back to top button