कोल्हापूर जिल्हा परिषद : दहा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव | पुढारी

कोल्हापूर जिल्हा परिषद : दहा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 78 गटांपैकी 10 मतदारसंघ अनुसूचित जाती (एस. सी.) प्रवर्गासाठी तर एक मतदारसंघ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव होणार आहेत. यासह महिलांसाठी एकूण 38 मतदारसंघ राखीव होतील. राखीव होणारे मतदारसंघ कोणते हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. दि.13 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत काढली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची फेररचना करण्यात आली आहे. त्यानुसार जि. प.च्या मतदारसंघांची संख्या 68 वरून 76 इतकी झाली आहे. मतदारसंघांची रचना अंतिम झाल्यानंतर आता त्याचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. ओबीसी प्रवर्ग वगळण्यात आला असून केवळ अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. अनुसूचित जातीचे दहा आणि जमातीचा एक मतदारसंघ राखीव होणार आहे. अनुसूचित जातीच्या दहा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ महिलांसाठी राखीव होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मतदारसंघ राखीव काढण्यासाठी लोकसंख्येचे सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी केली आहे. आयोगाच्या सूत्रानुसार प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढून अनुसूचित जातीचे मतदारसंघ प्रथम निश्चित केले जातील. यानंतर त्यापैकी पाच मतदारसंघ अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गांसाठी आरक्षित ठेवले जातील.

गतवेळी शिरोळ तालुक्यातील एक मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. यावर्षीही एकच मतदार संघ या प्रवर्गासाठी राखीव होईल. मात्र, यावर्षी हा मतदारसंघ अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव होण्याचीही शक्यता दाट आहे.

जिल्ह्यातील शिरोळसह हातकणंगले आणि चंदगड तालुक्यात या प्रवर्गातील लोकसंख्या अधिक असल्याने या वर्षी या तीन तालुक्यातील एक मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होईल, अशीही शक्यता आहे.

Back to top button