वरद पाटील हत्याप्रकरणी 10 तपास पथके कार्यरत | पुढारी

वरद पाटील हत्याप्रकरणी 10 तपास पथके कार्यरत

सावर्डे बुद्रुक ; पुढारी वृत्तसेवा : सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाच्या हत्येचा तपास करण्यासाठी दहा पथके स्थापन करण्यात आली आहेत. संशयित आरोपीला मरेपर्यंत फाशी होण्यासाठी आवश्यक तो तपास व भक्‍कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

वरदच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण पोलिस दल आहे, असा धीर त्यांनी रविवारी पाटील कुटुंबीयांना दिला. पाटील यांच्या घरी बलकवडे यांनी रविवारी भेट दिली. संशयित आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यासाठी कुटुंबीयांनी तपासकार्यात योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहनही बलकवडे यांनी केले.

तपास कामात कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी गावातच कुटुंबीयांचे व ग्रामस्थांचे जबाब घेण्यात येणार असल्याचेही बलकवडे यांनी सांगितले.

मारुती वैद्य यानेच वरद पाटील चा खून केल्याचे पाटील कुटुंबीयांनी बलकवडे यांना सांगितले. आपल्याला मूल व्हावे या उद्देशापोटीच त्याने हे अघोरी कृत्य केले आहे. त्यामुळे त्याला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पंचांग पाहणार्‍या संशयित आरोपीच्या भावालाही अटक झाली पाहिजे, संशयिताला फाशी व्हावी यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्‍ती करण्यात यावी, मारुती वैद्यसारखा दुसरा मारुती पुन्हा जन्माला येऊ नये यासाठी त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणीही यावेळी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, पोलिस नाईक स्वप्नील मोरे यांच्यासह पोलिस उपस्थित होते.

Back to top button