कोजिमाशि बिनविरोध करण्याची माझी भूमिका प्रामाणिक होती : आ. आसगावकर | पुढारी

कोजिमाशि बिनविरोध करण्याची माझी भूमिका प्रामाणिक होती : आ. आसगावकर

पेठवडगाव : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेची निवडणूक होऊ नये, ती बिनविरोध व्हावी, ही माझी प्रामाणिक भूमिका होती. त्याला सत्ताधारी नेतृत्वाने प्रतिसाद तर दिला नाहीच, उलट पालकमंत्र्यांचा अवमान केल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. माझ्या आमदारकीच्या विजयासाठी तमाम शिक्षक बंधू-भगिनींनी कंबर कसली होती. त्या निवडणुकीत तुम्ही नेमकी कशासाठी कंबर कसली होती? दुसर्‍या क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवारासोबत शाळांना आभाराच्या निमित्ताने भेटी कुणी दिल्या. हे सर्वांना माहीत आहे.

खरे- खोटे करण्यासाठी नार्को टेस्टला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. तुम्हीही या नार्को टेस्टसाठी तयारी ठेवा, असे आवाहन आ. प्रा. जयंत आसगावकर यांनी कोजिमाशिच्या सत्ताधारी नेतृत्वाला दिले. पेठवडगाव येथे राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीच्या प्रचार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

आ. प्रा. आसगावकर म्हणाले, कोजिमाशिचे सभासद उच्चशिक्षित शिक्षक आहेत. काय खरे,काय खोटे हे त्यांना चांगले समजते. एकतर्फी गैरकारभाराला या सभासदांचा मोठा विरोध आहे. मतपेटीतून हे सभासद या कारभाराविरोधात आपला कौल देतील. कोजिमाशिच्या सत्तेत मला स्वारस्य असण्याचे कारण नाही. आमच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचा कारभार उत्तम चालला आहे.

प्रारंभी प्राचार्य प्रदीप पाटील, यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापक सलीम मकानदार, प्रताप देशमुख, ए. बी चौगुले ए. बी. पाटील, सुभाष पाटील, संभाजी खोचरे यांची भाषणे झाली. मेळाव्यास के. के. पाटील, उदय पाटील, विलास साठे, बी. के. मोरे, बाबा शेलार, संजय डी. पाटील, गुरूप्रसाद यादव, डी. के. चव्हाण, श्री माळी, शिरसाठ, आपटे, शिवराय भादोले, उमेदवार अभिजीत गायकवाड आदींसह अन्य उमेदवार, सभासद उपस्थित होते. पी.बी.पाटील यांनी आभार मानले.

पेठवडगाव येथे आज जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यांतून सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आजी-माजी पदाधिकार्‍यांसह जुनी पेन्शन योजना कृती समिती, क्रीडा शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी पदाधिकार्‍यांनी जाहीर पाठिंबा दिला.

Back to top button