कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वाढीव मतदारसंघ संख्येला विरोध? | पुढारी

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वाढीव मतदारसंघ संख्येला विरोध?

कोल्हापूर ; विकास कांबळे : जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत पाच नवीन नगरपालिका, नगरपंचायती झाल्या आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघांची रचना 2011 नुसार करण्यात आली आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढविण्यात आली आहे. त्याला राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर आता विरोध होऊ लागला आहे.

मतदारसंघांची संख्या पूर्वीइतकीच ठेवावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेचा आकार कमी होऊ लागला आहे. शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. तेथील लोकसंख्या वाढत असल्याने या ग्रामपंचायतींनी नगरपालिकेत रूपांतर करण्याची मागणी सुरू केली आहे.

पूर्वी जिल्ह्यात नऊ नगरपालिका होत्या. त्यामध्ये महायुती सरकारच्या काळात पाच ग्रामपंचायतींचे नगरपालिका, नगरपंचायतींत रूपांतर करण्यास मान्यता दिली. नव्याने नगरपालिका, नगरपंचायती झालेल्यांमध्ये हातकणंगले, हुपरी, शिरोळ, आजरा व चंदगड यांचा समावेश आहे. यातील चार गावे ही तालुक्याची ठिकाणे आहेत.

आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांची रचना निश्चित करताना 2021 ची लोकसंख्या गृहीत धरणे आवश्यक होती; परंतु 2011 च्या लोकसंख्येवरच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदासंघ निश्चित करण्यात आले. मतदारसंघांची रचना करताना जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची संख्या 9 ने वाढवत 67 वरून 76 करण्यात आली.आता याला विरोध होत आहे. याच्याविरोधात आता न्यायालयात जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Back to top button