कोल्हापूर : जनजीवन पूर्वपदावर; मात्र पर्यटन ठप्पच... | पुढारी

कोल्हापूर : जनजीवन पूर्वपदावर; मात्र पर्यटन ठप्पच...

कोल्हापूर ; सागर यादव : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने शासनाने नियमांत दिलेल्या शिथिलतेमुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. विविध क्षेत्रे खुली झाली असली, तरी पर्यटन क्षेत्र अद्याप ठप्पच आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्‍या अनेक घटकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पर्यटन क्षेत्र खुले करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीला जोर आला आहे.

कोरोनाचा कहर कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. यामुळे शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली आहे. दिवसभर म्हणजेच रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स-व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असणारी विविध क्षेत्रे खुली झाली आहेत. मात्र, पर्यटन क्षेत्राला अद्याप परवानगी नसल्याने ती बंदच आहेत. यामुळे पर्यटन क्षेत्राला दररोज लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

छुपे पर्यटन सुरूच

निर्बंध शिथिल केल्याने अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. विविध कारणे सांगून लोक पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. जेथे पोलिस बंदोबस्त नाही अशी धार्मिक स्थळे, नैसर्गसंपन्न ठिकाणे, पाणस्थळे, गडकोट-किल्ले अशा ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. एकप्रकारे छुपे पर्यटनच सुरू आहे. यामुळे शासकीय महसूल व अनेकांचा रोजगारही वाया जात आहे. यावर उपाय म्हणून रीतसर, नियम व अटींचे पालन करून पर्यटन सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

राज्यातील पर्यटनस्थळे अद्याप ओसच

जगभरातील अनेक देशांत पर्यटन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक-शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. भारतातही अनेक राज्यांत पर्यटन क्षेत्र नियम व अटी लागू करून सुरू करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. त्यावर अवलंबून असणार्‍या हजारो लोकांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.

वस्तुसंग्रहालयेवर्षभर बंद

वस्तुसंग्रहालये तर गेली वर्षभर बंद असल्याने लोकांना सामाजिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक वारशापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे शासकीय महसूल तर बुडतच आहे. शिवाय, व्यवस्थापन व कर्मचारीवर्गावर होणारा खर्च सुरूच आहे. यावर उपाय म्हणून नियम व अटींसह पर्यटनस्थळांसह वस्तू संग्रहालये सुरू करावीत, अशी मागणी या क्षेत्रातून सातत्याने केली जात आहे.

कास पठार खुले, मग कोल्हापुरातील पर्यटनस्थळे का नाहीत?

सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून, कासचा फुलोत्सव 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे. कास पठार खुले, मग कोल्हापूर मधील पर्यटनस्थळे का खुली केली जात नाहीत? असा सवाल पर्यटकांतून केला जात आहे. दरम्यान, हिवाळी पर्यटनासाठी ठिकठिकाणी असणार्‍या पर्यटनस्थळांवर जोरदार बुकिंग आतापासूनच सुरू आहे.

Back to top button