कोल्हापूर : जिल्ह्यात आता नवा डाव, नवी मांडणी! | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात आता नवा डाव, नवी मांडणी!

कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

स्थापनेपासून गटातटांत विभागलेल्या शिवसेनेत आता नवा डाव नवी मांडणी सुरू झाली आहे. हा डाव कितवा, हे शिवसेनेचे नेते सांगतील. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवा डाव मांडून वरिष्ठ नेत्यांनी स्थानिकांवर मोठी जबाबदारी टाकली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापुरात स्वतः येऊन शिवसेनेची स्थापना केली. सध्याचे मित्र प्रेम मंडळ असलेल्या ठिकाणी भगवा ध्वज फडकविला. शिवसेनाप्रमुखांनी तेथे जमलेल्या नागरिकांना शिवबांचा महाराष्ट्र कसा असावा आणि कसा नसावा, हे ऐकायला बिंदू चौकात या, असे आवाहन केले आणि बिंदू चौकातील सभेत शिवसेना स्थापनेची भूमिका मांडली.

कोल्हापुरात त्यापूर्वी शिवसेना स्थापनेचे प्रयोग झाले होते; मात्र यावेळी अत्यंत नियोजनपूर्वक हे सर्व पार पडले. त्यात चंद्रकांत साळोखे, रामभाऊ चव्हाण, सुरेश साळोखे ही मंडळी आघाडीवर होती; मात्र पुढे साळोखे-चव्हाण यांच्यात वाद झाला. या वादाचे परिणाम संघटनेला भोगावे लागले. विधानसभा निवडणुकीत सुरेश साळोखे दोन वेळा निवडून आले. तिसर्‍या प्रयत्नात त्यांना पराभवाचा फटका बसला. हा फटका शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा संघर्षाचा होता. या संघर्षातून कुणीच धडा घेतला नाही. लालासाहेब यादव यांच्यानंतर मालोजीराजे यांनी कोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा फडकविला. मात्र, नंतर 2009 च्या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकाविला. त्यांना 2009 आणि 2014 अशी दोनदा संधी मिळाली. पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढाईत शिवसेनेचा पराभव झाला आणि काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले.

2019 मध्ये राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या तिन्ही पक्षांत एक अलिखित करार झाला. ज्या पक्षाचा उमेदवार जेथे असेल तेथे त्याच पक्षासाठी जागा द्यायची आणि अन्य पक्षांनी त्यांना मदत करायची, असे ठरले होते. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने ही जागा काँग्रेस लढविणार हे स्पष्ट होते, तरीही शिवसेनेने प्रयत्न केले. पोटनिवडणुकीत जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव विजयी झाल्या; मात्र 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांना मिळालेली मते आणि शिवसेनेला मिळालेली मते यांच्या मताच्या बेरजेएवढी मते जयश्री जाधव यांना मिळाली नाहीत.

त्याचप्रमाणे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी यापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट मते घेतली. या दोन्ही उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी बरेच काही सांगून जाते. या आकडेवारीतूनच शिवसेनेत अंतर्गत काय चालले होते, कोण कुणाकडे होते याचे उत्तर आता समोर येत आहे. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत पडद्यामागे काय घडत होते, याचे उत्तर आता आकडेवारीबरोबरच राजकीय घडामोडीतून स्पष्ट झाले आहे. राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले.

त्यामुळे शिवसेनेने तातडीने ढासळलेली तटबंदी सावरत सुनील मोदी, रवीकिरण इंगवले आणि हर्षल सुर्वे यांच्यावर पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवत नवे नेतृत्व पुढे आणले आहे. या नेतृत्वाचा काळ कसोटीचा आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याचबरोबर दक्षिणमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. येथे पक्षबांधणी करून मतदान केंद्राच्या पातळीपर्यंत नियोजन करण्याचे आव्हान आहे. हे आव्हान नव्या नेतृत्वाने पेलले, तर त्यांच्यासाठी संधीची नवी दारे निश्‍चितपणे उघडतील.

Back to top button