अपहरण मुलांचे : दोष काय होता...कोवळ्या जीवाचा? | पुढारी

अपहरण मुलांचे : दोष काय होता...कोवळ्या जीवाचा?

कोल्हापूर ; दिलीप भिसे : तशी ती चिमुरडी पोरं… सहा, सात वयोगटातली… निरागस, गोंडस… अजूनही आई, बाबा आणि आजोबा-आजीच्या कुशीत बागडणारी… आता कुठं तोंड फुटल्यालं… मोडक्या-तोडक्या शब्दांत गुणगुणत सारं घर खेळण्यांनी भरून टाकणार्‍या छकुल्यांना समाजात बोकाळलेली, जीवघेणी प्रवृत्ती काय उमजणार..? पण याच माथेफिरू प्रवृतीनं मिरजेतला रितेश, देवकर पाणंदमधला दर्शन आणि आता सोनाळीचा (ता. कागल) वरद… मनाचा थरकाप उडविणार्‍या मालिकेत कोवळ्या मुलाचे अपहरण करून माथेफिरूने गळा चिरला… काय दोष होता कोवळ्या जीवाचा..?

एकेकाळी बालहत्याकांडामुळे महाराष्ट्र हादरला होता. क्रूरकर्मी अंजना गावितसह तिच्या पाषाणहृदयी मुलींनी मातेच्या कुशीत बागडणार्‍या अनेक चिमुरड्यांचे अपहरण करून गुन्हेगारी कृत्यासाठी वापर केला. या कृत्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अनेक मुलांचा गळा घोटून हत्या केली. केलेल्या दुष्कृत्याचे प्रायश्चित्त गावित माय-लेकी कारागृहात भोगत आहेत; पण अनेक माता, पित्यांना झालेल्या जखमा आजही भळभळून वाहत आहेत त्यांचे काय? हा दु:खवियोग 20 वर्षांनंतरही निष्पाप कुटुंबांना सतावत आहे.

सावर्डे (ता. करवीर) येथील आजोबांकडे आलेला सोनाळीचा वरद रवींद्र पाटील (वय 7) हा मंगळवारी (दि. 17) रात्री आठला अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांसह नातेवाईक, ग्रामस्थांनी चिमुरड्याचा शोध घेतला. पोलिसांनीही जंगजंग पछाडले; पण शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळी सावर्डे बुद्रुकपासून एक किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला.

गळा चिरलेल्या स्थितीत तसेच अंगावर जखमांचे व्रण आढळून आल्याने मुलाचा अमानुषपणे खून झाल्याचे उघड झाले. चौकशीअंती वरदचे वडील डॉ. रवींद्र पाटील यांचा मित्र असलेल्या दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य या नराधमाने मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. माथेफिरूला फासावर लटकवा, यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर आले.

वरदच्या हत्येने आक्रोश; पश्चिम महाराष्ट्रही हळहळतोय!

चिमुरड्याचे अपहरण आणि अमानुष हत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र हळहळत आहे. महिलावर्गात संताप आहे. चिमुरड्याच्या मारेकर्‍याला फाशी हेच प्रायश्चित्त आहे, अशीच सार्वत्रिक भावना आहे. त्यासाठी रणरागिणी रस्त्यावर उतरल्या आहेत. मुलाच्या हत्येनंतर माथेफिरूचे तासाभरात वरदच्या आजोबांच्या घरी येणे, मुलाच्या शोधासाठी स्वत: पुढाकार घेणे, याबाबी नियोजित कटाचा भाग असू शकतात. मुळात मुलाची ज्या क्रूरपणे हत्या झाली, त्याचा उलगडा होणे स्वाभाविक आहे. काय दोष होता कोवळ्या जीवाचा? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिरजेतील रितेशचे खंडणीसाठी अपहरण अन् अमानुष खून

7 सप्टेंबर 2002… मिरजेतील रितेश देवताळे (वय 8) या निष्पाप बालकाच्या अमानुष हत्येमुळे पश्चिम महाराष्ट्र हादरला होता. खंडणीसाठी रितेशचे अपहरण करण्यात आले. तीन दिवसांनी मुलाची हत्या करून मृतदेह पंढरपूर रस्त्यावर सिमेंटच्या पाईपमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित रितेशच्या शोधासाठी पुढे होते. पोलिस अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात अग्रस्थानी होते. अखेर शंकेची पाल चुकचुकली. एका राजकीय पक्षाच्या शहरप्रमुखासह साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांचे बिंग फोडले.

निष्पाप दर्शन शहाच्या हत्येमुळे कोल्हापूरही हादरलं!

25 डिसेंबर 2012… कोल्हापूर येथील दर्शन शहा (वय 10) या शाळकरी मुलाचे शुश्रूषानगर येथील योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे याने खंडणी वसुलीतून राहत्या घरातून अपहरण केले. गळा आवळून त्याचा खून केला. राऊत यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

तत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत केडगे, संतोष डोके यांनी चांदणेच्या कृत्याचा पर्दाफाश करून बेड्या ठोकल्या होत्या. दर्शनच्या मारेकर्‍याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. निष्पाप मुलाच्या हत्येप्रकरणी चांदणेला आजन्म कारावास भोगावा लागत आहे.

Back to top button