आमचा देव मंदिरातच योग्य होता! : राजेश क्षीरसागर | पुढारी

आमचा देव मंदिरातच योग्य होता! : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर आहे. आमचा देव (उद्धव ठाकरे) मंदिरात होता, तेच योग्य होते. त्यांना बाहेर काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली, अशा शब्दांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भावना व्यक्त केल्या. क्षीरसागर यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात आता पाटील व क्षीरसागर यांच्यातील ही साखर पेरणी समजली जाते.

महाराष्ट्रात शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजप यांची सत्ता स्थापन होऊन मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतत आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी झालेले क्षीरसागर अद्याप मुंबईत असून गुरुवारी (दि. 7) कोल्हापुरात येणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील व क्षीरसागर यांच्यात गेल्या काही वर्षांपासून मतभेद होते. राज्यात अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दोघांतील संबंध खूप ताणले गेले होते; मात्र आता शिवसेनेतील मुख्यमंत्री शिंदे गट व भाजप यांचे एकत्रित सरकार स्थापन झाल्यानंतर क्षीरसागर यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेऊन मन मोकळे केले.

Back to top button