शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती | पुढारी

शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोल्हापुरात शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. शिवसेनेने तत्काळ नव्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. कोल्हापूर उत्तर शहरप्रमुखपदी सुनील मोदी यांची तर दक्षिण मतदारसंघाच्या शहरप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती केली आहे.

शिवसेनेत अचानक बंड होऊन एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट तयार केला. कोल्हापुरातील सेनेचे आ. प्रकाश आबिटकर, शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे सेना पदाधिकार्‍यांना चांगलाच धक्का बसला.

पंधरा दिवसांच्या घडामोडीनंतर जेथे बंडाळी झाली तेथे नव्याने पदाधिकारी निवड, पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याअंतर्गत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी शहरप्रमुख म्हणून सुनील मोदी तर कोल्हापूर दक्षिण शहर विधानसभा मतदारसंघासाठी रविकिरण इंगवले यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांची नियुक्ती केली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी पोपट दांगट (कोल्हापूर दक्षिण विधानसभा, जिल्हा परिषद-उचगाव, मुडशिंगी, उजळाईवाडी), अवधूत साळोखे (कोल्हापूर दक्षिण विधानसभा, जिल्हा परिषद-पाचगाव, निगवेखालसा, गोकुळ शिरगाव) यांचीनियुक्ती केली आहे. मोदी यांनी महापालिकेचे उपमहापौर तर इंगवले यांनी स्थायी समिती सभापती व उपमहापौर म्हणून काम केले आहे.

इंगवले यांच्याकडे नव्याने जबाबदारी

यापूर्वी कोल्हापूर शहरातील पदाधिकार्‍यांची नावे राजेश क्षीरसागर निश्चित करत होते. त्यांनी शहरप्रमुख म्हणून जयवंत हारुगले यांची निवड केली होती. हारुगले यांच्या अगोदर रविकिरण इंगवले यांच्याकडे हे पद होते, नंतर इंगवले यांचे पद काढून घेण्यात आले. सध्या इंगवले व क्षीरसागर यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. इंगवले यांच्याकडे नव्याने दक्षिण शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.

Back to top button