कसबा बावड्यात रात्रीत सहा घरफोड्या | पुढारी

कसबा बावड्यात रात्रीत सहा घरफोड्या

कसबा बावडा ; पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा येथे रविवारी रात्री सहा ठिकाणी घरफोड्या झाल्या. दाटीवाटीच्या गल्लींमध्ये हा प्रकार घडल्यामुळे आता गावठाणचा परिसरही असुरक्षित झाला आहे. दोन ठिकाणी चोरीत मिळून दीड तोळे सोने आणि 5000 रुपये रोख चोरीस गेल्याचे समजते. चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

माळगल्ली येथील धनराज पाटील यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील तिजोरी मधील साहित्य विस्कटून चोरट्याने अर्धा तोळा सोन्याची अंगठी लांबवली. यानंतर चोरट्याने रात्री 1.50 वा. लगतच्या बाबासाहेब रामचंद्र पाटील यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटला. याची चाहूल लागताच घरात वरच्या मजल्यावर झोपलेल्या बाबासाहेब यांनी आवाज दिला, चोर चोर म्हणून त्यांनी ओरडल्यानंतर चोरट्याने पलायन केले.

यानंतर चोरट्याने आपला मोर्चा हनुमान गल्ली येथील दिगंबर मर्दाने यांच्या घराकडे वळवला, त्यांच्या बंद घराचा दरवाजा उघडल्यावर कुलूप खाली पडले वरच्या मजल्यावर राहत असलेल्या दिगंबर यांनी तत्काळ खाली धाव घेतली. त्याची चाहूल लागताच चोरट्याने पलायन केले. दिगंबर मर्दाने व त्याच्या मित्रांनी तासभर कसबा बावडा परिसरात चोरट्याचा शोध घेतला; पण तो आढळून आला नाही.

प्रिन्स शिवाजीनगर येथील नामदेव परीट यांच्या घरी पहिल्या मजल्यावर असलेल्या सागर गुरव या कुळाच्या बंद घराचा दरवाजा उचकटून चोरट्याने घरातील तिजोरीमधील साहित्य विस्कटले. चोरट्याने पुढे जवळच्या अनमोल पवार यांच्या घरातही असाच प्रकार केला. सुदैवाने दोन्ही ठिकाणी चोराच्या हाती काहीच लागले नाही.

रात्री तीनच्या सुमारास चव्हाण गल्ली येथील सतीश मधुकर पंदारे यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून चोरट्याने तिजोरीतील एक तोळा सोन्याचे दागिने व 5 हजार रुपये रक्कम लांबवली. सकाळी साडेसातच्या सुमारास शाहूपुरी पोलिसांचे पथक चोरीच्या घटना घडलेल्या विविध ठिकाणी भेट दिली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले; पण ते काही अंतरावर जाऊन घुटमळले. दिवसभर पोलिसांचे पथक विविध ठिकाणी माहिती घेत होते.

Back to top button