खंडपीठाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणार : खा. धनंजय महाडिक | पुढारी

खंडपीठाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणार : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला आणि कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न संसदेत उपस्थित करणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी नूतन खासदार महाडिक यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी झालेल्या आंदोलनाला आपण पाठिंबा देऊन आंदोलनात सक्रिय झालो होतो, असे स्पष्ट करून खा. महाडिक पुढे म्हणाले, भविष्यात आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी खंडपीठ अथवा सर्किट बेंच स्थापनेसाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. संसदेतही हा प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधणार आहे.

खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण, सचिव अ‍ॅड. विजयकुमार ताटे-देशमुख यांच्या हस्ते खा. महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहसचिव संदीप चौगुले, संकेत सावर्डेकर, तृप्ती नलवडे, सुशांत चेंडके, शुभांगी नलवडे, कर्णकुमार पाटील, विक्रम पाटील, विशाल फराकटे, संदीप मालेकर, अरुण शिंदे, सम—ाट शेळके, वारणा सोनवणे, रणजित जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button