कोल्हापूर महापालिका : 60 कोटी वसुलीसाठी 13 हजार जणांना नोटिसा | पुढारी

कोल्हापूर महापालिका : 60 कोटी वसुलीसाठी 13 हजार जणांना नोटिसा

कोल्हापूर ; सतीश सरीकर : महापालिका पाणीपुरवठा विभागाने थकबाकी वसुलीसाठी आता कंबर कसली आहे. तब्बल 59 कोटी 45 लाख 70 हजार 174 रु. वसुलीसाठी 13 हजार 108 नळ कनेक्शनधारकांना मंगळवारपासून नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. कोल्हापूर शहरातील रहिवासी 12 हजार 34, व्यापारी 527 आणि औद्योगिक 547 नळ कनेक्शनधारकांचा यात समावेश आहे. थकबाकी न भरल्यास नळ कनेक्शन तोडण्यापासून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

कोल्हापुरात एकूण 1 लाख 19 हजार 431 नळ कनेक्शनधारक आहेत. मार्च 2022 अखेर 71 कोटी 33 लाख 43 हजार रु. थकबाकी आहे. 10 हजार रुपयांच्यावर थकबाकीदार असलेल्यांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेली काही वर्षे पाणीपुरवठा विभागाकडील थकबाकीत वाढ होत आहे. महापालिकेने काही वर्षापूर्वी सार्वजनिक नळ बंद करून शहरातील झोपडपट्टीवासीयांना सवलतीच्या दरात कनेक्शन दिले होते. त्याची संख्या 6 हजार आहे. झोपडपट्टीधारकांनी वेळेत बिले न भरल्याने त्यावर दंड, व्याज आदी वाढून ही रक्कम आता 6 कोटीच्यावर गेली आहे.

31 मार्च 2022 अखेर शासकीय कार्यालयातील 310 नळ कनेक्शनधारकांकडे 22 कोटी 17 लाख रु. थकबाकी आहे. शहर परिसरातील 12 ग्रामपंचायतींकडे 7,78,56,511 रु., सीपीआर 7,41,74,664 रु., रेल्वे विभाग 2,15,39,947 रु. पाटबंधारे विभाग (वारणा) 1,21,94,828 रु. शिवाजी विद्यापीठ 94,40,664 रु., पाटबंधारे विभाग (पंचगंगा) 80,16,417 रु., सार्वजनिक बांधकाम 78,16,781 रु., जिल्हाधिकारी कार्यालय 27,45,500 रु., जिल्हा परिषद 15,85,520 रु., टेलिफोन भवन 10,06,188 रु. हे टॉप टेन थकबाकीदार आहेत.

Back to top button