कोल्हापूर : जलसंधारण विभागाचा कामांचा धडाका | पुढारी

कोल्हापूर : जलसंधारण विभागाचा कामांचा धडाका

कोल्हापूर ; सुनील सकटे : जलसंधारण विभागाने जिल्ह्यात दोन वर्षांत लघु पाठबंधारे तलाव आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यांच्या कामांचा धडाका लावला आहे. यंदा तब्बल 18 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यांचे तसेच चार लघुपाटबंधारे यात यंदापासून पाणी साठवणे सुरू झाले आहे.

जलसंधारण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली जात आहे. कामे पूर्ण झालेल्या तलाव आणि लघुपाटबंधारे तलावांमध्ये पाणी साठवण्याची सुरुवात केली जाते. या विभागाने सन 2021-2022 आणि 2022-2023 या दोन वर्षात शाहूवाडी तालुक्यातील रनवरेवाडी आणि राधानगरी तालुक्यातील झापाचीवाडी या दोन लघुपाटबंधारे तलावाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच भुदरगड तालुक्यातील निष्णप आणि शाहूवाडी तालुक्याीतल चांदोली या दोन ल.पा.तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या चारही तलावांत आता यंदापासून पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे.

भुदरगड तालुक्यातील म्हसवे एक व दोन, अंतिवडे, मोरेवाडी, देवर्डे; तर पन्हाळा तालुक्यातील माले, मोहरे, शाहूवाडी तालुक्यात बर्की एक व दोन, येळवणजुगाई एक ते चार, चंदगड तालुक्यातील गुडवळे आणि गडहिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी एक व दोन, मुत्नाळ अशा एकूण 18 केटीवेअरचे काम पूर्ण झाले आहे. या सर्व केटीवेअरमध्ये यंदा पाणी साठविण्यात येणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले आणि आजरा तालुक्यातील मोरेवाडी या दोन पाझर तलावांचेही काम पूर्ण झाले असून पाणी साठवणूक केली जाणार आहे.

कामे अंतिम टप्प्यात : आजगेकर

भुदरगड तालुक्यातील वासनोली, पडखंबे, पळशिवणे तर शाहूवाडी तालुक्यातील वाकोली अशा चार लघुपाटबंधारे तलावांचे काम प्रगतीपथावर असल्याचे जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर यांनी सांगितले.

Back to top button