कोल्हापूर : 35 लाखांची दारू, गुटखा जप्त; पाठलाग करून तिघांना पकडले | पुढारी

कोल्हापूर : 35 लाखांची दारू, गुटखा जप्त; पाठलाग करून तिघांना पकडले

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात ‘लिकर किंग’ नावाने कुख्यात असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दारू तस्करी टोळीतील म्होरक्यांसह तिघांच्या उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर पथकाने पाठलाग करून उजळाईवाडीजवळ मुसक्या आवळल्या; तर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इचलकरंजीजवळ पिकअप वाहनातून पुण्याकडे गुटख्याची तस्करी करत असलेल्या तिघांच्या टोळीला अटक केली. या दोन्ही टोळ्यांकडून मिळून 34 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वैजनाथ चन्नाबसप्पा ढंगापुरे (वय 35, रा. एकतानगर, वालचंद कॉलेजजवळ, सोलापूर शहर), अजय विलास लोंढे (29, लक्ष्मीनगर बाळे, ता. उत्तर सोलापूर), अर्जुन रमेश कांबळे (27, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोवा, सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिस रेकॉर्डवरील तिघा तस्करांचे नावे निष्पन्न झाली आहे. संशयितांना लवकर अटक करण्यात येईल, असे उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक रवींद्र आवळे यांनी सांगितले.

रॅकेटमधील गोवा, सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील बड्या तस्करांची नावे निष्पन्न झाली आहेत. गोवा बनावटीच्या दारूची रविवारी मध्यरात्रीला कोल्हापूरमार्गे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याकडे तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच अधीक्षक आवळेसह पथकाने चंदगड, गडहिंग्लज व आजरा येथे गस्ती पथके तैनात केली. मात्र चंदगड, गडहिंग्लज येथील पथकांना चकवा देत तस्करांनी मध्यरात्री आजरा गाठले. तेथून मंडपाच्या साहित्यासह गाद्या घेऊन जाणारा टेम्पो कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जात असल्याचे निदर्शनास आले.

लग्नाच्या साहित्यात लपवून दारूची तस्करी

पथकाने भरधाव टेम्पोचा उजळाईवाडी येथील उड्डाणपुलापर्यंत पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले. टेम्पोमध्ये मंडपाचे साहित्य, खुर्च्या, गाद्यांसह लग्नाचे साहित्य असल्याचे भासविले. मात्र पथकाने टेम्पोमधील साहित्य उतरविले. गाद्यांमध्ये विविध ब—ँडच्या 120 दारूचे बॉक्स आढळून आले.

कर्नाटकातून पुण्याला गुटख्याची तस्करी

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : बोरगाव – इचलकरंजीमार्गे पुण्याकडे पिकअप वाहनातून गुटखा तस्करी करणार्‍या टोळीला पंचगंगा नदीजवळ पकडून सुमारे 16 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

तुषार तुकाराम खंडाळे (19), राजाराम पिराराम बिष्णोई (32, रा. पुणे), आनंद बापू साळवे (35, तिघे रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली.

अंमलदार नितीन चोथे यांना गोपनीयरीत्या माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या पथकाने पंचगंगा पुलाजवळ सापळा रचला. त्यावेळी बोलेरो पिकअप (एमएच 12 केपी 9869) या वाहनाला संशयावरून थांबवले. तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी वाहन, गुटखा, तीन मोबाईल जप्त केले. ही कारवाई शेषराव मोरे, अनिल पास्ते, अमोल कोळेकर, संदीप कुंभार, रणजित पाटील आदींनी केली.

Back to top button