कोल्हापूर : दर्जाहीन धान्यामुळे विक्री! | पुढारी

कोल्हापूर : दर्जाहीन धान्यामुळे विक्री!

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : रेशनवर मिळणार्‍या गव्हामध्ये आढळणारी रेती, खडे निवडताना गृहिणी वैतागून जातात. लाल गव्हाची चपाती खाण्यावरूनही घरच्या मंडळींमध्ये नाकं मुरडणारे अनेकजण आहेत. अतिरिक्त गहू, तांदळाऐवजी तेल, डाळही मिळावी, अशी गृहिणींची अपेक्षा आहे. तसेच जर रेशनचा गहू दर्जेदार मिळाला तर विक्रीची वेळच येणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

रेशनचा गहू, तांदूळ अतिरिक्त झाल्याने अनेकांनी तो परस्पर विकण्याचा पर्याय निवडला. काळ्या बाजारात असा रेशनचा गहू व तांदूळ घेण्याची चढाओढच सध्या पाहायला मिळते आहे. मोफत मिळालेल्या धान्याला किलोमागे 10 ते 15 रुपये मिळत असल्याने अनेक कुटुंबांकडून त्याची विक्री करून इतर बाजार भरला जातो; पण या गव्हाचा दर्जाच चांगला मिळाला तर कोणी हा गहू विकण्याच्या फंदातच पडणार नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून उटमत आहे.

तेल, डाळी बंदच

गहू व तांदूळ केवळ 2 ते 3 रुपये किलोने मिळत असले तरी ते शेतकर्‍यांकडून विकत घेताना शासनाला त्यांचा योग्य भाव अदा करावा लागतो. तसेच मोफत धान्य वाटपाचा अतिरिक्त आर्थिक भारही शासनाच्या तिजोरीवर पडतो. असा दर्जाहीन गहू देण्याऐवजी बंद केलेले पामतेल, डाळ पुन्हा वितरित करावी, अशी अपेक्षा गृहिणी व्यक्त करत आहेत.

रेशन धान्याला वाढती मागणी

सध्या चिकनचा दर 250 ते 300 रुपये किलो झाला आहे. जिल्ह्यात पोल्ट्री व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. पोल्ट्रीधारकांकडून रेशनच्या धान्याला मोठी मागणी आहे. त्यांची नड भागविण्यासाठी अनेक भागात घरोघरी फिरून रेशनचे धान्य गोळा केले जात आहे.

Back to top button