कोल्हापूर : इलेक्ट्रिक वाहने वाढली; चार्जिंग स्टेशनचा तुटवडा | पुढारी

कोल्हापूर : इलेक्ट्रिक वाहने वाढली; चार्जिंग स्टेशनचा तुटवडा

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : कोल्हापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना या वाहनांच्या चार्जिंगसाठी जिल्ह्यात अद्याप एकही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले गेले नाही. परराज्यांतून येणार्‍या ई-व्हेईकलना वाहनांच्या चार्जिंगसाठी हॉटेल किंवा ढाबे पर्याय ठरत आहेत.

इंधनांचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणार्‍या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. त्या अनुषंगाने वाहन क्षेत्राची बाजारपेठ बदलत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कारवर भर देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशभरात चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सद्यःस्थितीत 5 हजारांहून अधिक वाहने बॅटरीवर चालणारी आहेत. दुचाकी वाहनांचे चार्जिंग घरातच केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगची सोय नसल्याने चारचाकी ई-व्हेईकल वापरणारे स्थानिक नागरिक घरातच वाहनांचे चार्जिंग करत आहेत.

कोल्हापूर हे कर्नाटक तसेच कोकण मार्गाला जोडले गेले आहे. कोल्हापुरात पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात परराज्यांतील अनेक पर्यटक ई-व्हेईकल घेऊन कोल्हापुरात येतात किंवा इथून पुढे कर्नाटक गोव्याला जातात; पण या वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन्स नाहीत. पुणे सोडल्यानंतर कोल्हापूरपर्यंत एकाही कंपनीचे चार्जिंग स्टेशन नाही. त्यामुळे अशा वाहनांना चार्जिंगसाठी हॉटेल किंवा ढाबे हेच पर्याय आहेत; पण या ठिकाणी वाहनांचे फास्ट चार्जिंग होत नाही. पर्यटकांना तासन्तास थांबावे लागते. यात त्यांचा वेळही जातो.

* कोल्हापुरात 300 हून अधिक पेट्रोल पंप आहेत. यातील 50 टक्के पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य आहे. खासगी कंपन्या चार्जिंग स्टेशन उभारत आहेत; पण पश्चिम महाराष्ट्राकडे या कंपन्यांचे दुर्लक्षच आहे. काही पेट्रोलियम कंपन्यांकडून सर्व्हे झाला आहे; पण भविष्यात ई-व्हेईकल वाहनांची वाढती संख्या पाहता चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे माजी अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.

Back to top button