गारगोटी : उपचाराअभावी रुग्णाचा कडगाव आरोग्य केंद्राच्या दारातच मृत्यू | पुढारी

गारगोटी : उपचाराअभावी रुग्णाचा कडगाव आरोग्य केंद्राच्या दारातच मृत्यू

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा :  वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्‍या दारातच रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील निर्दयी डॉक्टर व कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. केरबा सुभाना दिवेकर (वय ५५, रा. म्हासरंग) असे मृत रूग्णाचे नाव आहे.

केरबा दिवेकर यांची प्रकृत्ती बिघडली. नातेवाईकांनी १०८ रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र रूग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे खासगी वाहनातून रूग्णाला कडगाव प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. सकाळी ८.३० वाजण्याचा सुमारास आलेल्या रूग्ण दवाखान्याचा दरवाजा बंद असल्यामुळे भर पावसात उपचारासाठी ताटकळत होता. उपचारासाठी डॉक्टरांची विचारणा केली असता डॉक्टर नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, दवाखान्यातील कर्मचार्‍यांनी कुलुप उघडून साधे दवाखान्यात देखील घेण्याची तसदी घेतली नाही. डॉक्टरांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रूग्णाचा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारावरच मृत्‍यू झाला. रूग्णाच्या नातेवाईकांनी  केलेल्‍या आक्राेशाने  लोकांनी गर्दी केली.

रूग्णाच्या संतप्‍त नातेवाईकांनी दवाखान्यातील कर्मचारी व डॉक्टरांच्यावर शिव्याची लाखोली वाहत गोंधळ घातला. तब्बल दोन तास रूग्णाचा मृतदेह दवाखान्याच्या दारासमोरच होता. संबंधित कर्मचारी व डॉक्टरावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केरबा  दिवेकर यांच्‍या नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button