राजेश... ज्याने पायाने पेपर लिहीत इंजिनियरिंग पूर्ण केलं! | पुढारी

राजेश... ज्याने पायाने पेपर लिहीत इंजिनियरिंग पूर्ण केलं!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जन्मत:च दोन्ही हात नसलेला राजेश… आई, वडील किंवा नातेवाईकांचेही छत्र डोक्यावर नाही… पायाने लिहिणार्‍या राजेशने कष्टाने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली… अन् नुकताच तो एका आय. टी. कंपनीत ज्युनिअर सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी निभावत आहे. निसर्गाने विकलांतगतेचे ओझे त्याच्या माथी मारले होते; पण या सर्वांवर मात करून तो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन स्वत:च्या पायावर उभा राहिला आहे.

बारा वर्षांपूर्वी राजेश मुंबईच्या अनाथाश्रमामार्फत हेल्पर्स ऑफ द हँडीकॅप्ड संस्थेत दाखल झाला. तेव्हा तो केवळ पंधरा वर्षांचा होता. जन्मत:च दोन्ही हात नसलेला, आई, वडील किंवा अन्य कोणी नातेवाईक यांचा पत्ता नसलेला हा मुलगा. संस्थेचे प्रमुख पी. डी. देशपांडे आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे राजेशच्या वर्तनाविषयी अनेक तक्रारी येऊ लागल्या होत्या. हा एक वर्तन समस्यांनी ग्रासलेला, व्यसने करणारा पौंगडावस्थेतील मुलगा होता. संस्थेच्या घरौंदा वसतिगृह आणि समर्थ विद्यालयातील प्रेमळ आणि शिस्तबद्ध संगोपनाचा राजेशवर परिणाम जाणवू लागला. समर्थ विद्यालयातून तो दहावी उत्तीर्ण झाला.

आयुष्याला कलाटणी

अकरावीला महावीर कॉलेजला प्रवेश घेतलेल्या राजेशची आवड काही वेगळीच होती. पी. डी. देशपांडे यांनी त्याच्यातील तांत्रिक कौशल्ये ओळखून गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये आयटी डिप्लोमासाठी प्रवेश मिळवून दिला. दोन्ही हात नसल्यामुळे हाही अभ्यासक्रम त्याच्या द़ृष्टीने अडथळ्यांची शर्यतच ठरली. अपयश पचवत निर्धाराने आणि नेटाने पुढे जात त्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मिळवला. पुढे कराडच्या सरकारी कॉलेजातून डिग्री घेतली.

परिस्थितीवर मात

हात नसलेल्या, पायानेच लिहू शकणार्‍या तरुणाने बी.ई.ची पदवी मिळवली ही काही साधी गोष्ट नव्हती. याच संघर्षातून तो आता बेंचमार्क आय. टी. सोल्युशन्स या कंपनीत ज्युनिअर सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी पेलू लागला आहे. राजेश पायानेच संगणक हाताळून आपले काम करतो. कंपनीतील इतर कर्मचार्‍यानांही तो त्यांच्या कामात सहकार्य करताना दिसून येतो.

हेही वाचले का? 

Back to top button