चोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना! | पुढारी

चोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना!

कोल्हापूर : गौरव डोंगरे

चोरीच्या गुन्ह्यांची उकल होईना!

लॉकडाऊननंतर जिल्ह्यात चोर्‍यांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. घरफोड्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, गेल्या काही दिवसांत जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढली आहे. यासोबतच जबरी चोर्‍यांचेही प्रमाण वाढत असून, महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. जानेवारी ते जुलैअखेर सात महिन्यांत जिल्ह्यात चोरीच्या 858 घटनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली असून, यापैकी केवळ 180 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यांची उकल होण्याचे हे प्रमाण केवळ 21 टक्केच असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील गजबजलेल्या संभाजीनगर परिसरात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील चार ठिकाणी घरफोड्या झाल्या. यामध्ये मुद्देमाल किरकोळ गेला असला तरी पहाटे तिघा संशयितांनी बंद घरांना लक्ष्य केले. याचवेळी नागाळा पार्कातील एका बांधकाम साहित्याच्या शोरूममधून सात लाखांचे साहित्य चोरीस गेले, तर रुईकर कॉलनीतील बंद फ्लॅटमधून ताट, वाट्या, पेल्यांसह प्रापंचिक साहित्यच चोरट्यांनी उचलून नेले.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प

मागील सात महिन्यांत जिल्ह्यात चोरीच्या 858 घटनांची नोंद झाली आहे. यातील केवळ 180 गुन्हे उघड झाले असून, हे गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण 20.97 टक्के आहे. घरफोडीच्या 168 गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली आहे. यातील 41 गुन्हे उघड झाले असून, हे प्रमाण 24. 55 टक्के आहे. तर 70 जबरी चोर्‍यांपैकी 38 गुन्हे उघड झाले असून हे प्रमाण 54. 28 टक्के असल्याचे दिसून येते.

Back to top button