इचलकरंजी : स्क्रॅप व्यावसायिकाला लाखाच्या खंडणीसाठी धमकावले | पुढारी

इचलकरंजी : स्क्रॅप व्यावसायिकाला लाखाच्या खंडणीसाठी धमकावले

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : कबनुरातील स्क्रॅप व्यावसायिकाला एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याने जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा शेखर जर्मनी (वय 25) व प्रवीण मल्‍लाप्पा मगदूम ऊर्फ कन्‍नड पव्या (दोघे रा. कबनूर) या दोघा संशयितांना गुरुवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील आणखी दोघे संशयित पसार आहेत. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

जर्मनी गँगचा म्होरक्या आनंदा जर्मनी कारागृहातून सुटल्यानंतर त्याचे कारनामे पुन्हा वाढले होते. त्यातच त्याने आपला साथीदार प्रवीण मगदूम ऊर्फ कन्‍नड पव्या, शुभम पट्टणकुडे, शिवा शिंगे यांना सोबत घेतले. कबनुरात एका स्क्रॅप व्यावसायिकास धमकावत त्याच्याकडे एक लाखांची खंडणी मागितली. जीवाच्या भीतीने या स्क्रॅप व्यावसायिकाने 20 हजारांची रक्‍कम या गँगला दिली. मात्र, पुन्हा उर्वरित रकमेच्या मागणीसाठी जर्मनी गँगने त्याच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.

त्यापैकी आनंदा जर्मनी व त्याचा साथीदार प्रवीण मगदूम या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. उर्वरित शिंगे व पट्टणकुडे या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई सपोनि दिनेश काशीद, उपनिरीक्षक मनोज पाटील, सागर चौगुले, सुनील बाईत, विजय माळवदे, गजानन बरगाले, प्रवीण कांबळे, अमित कांबळे आदींनी केली. जर्मनी गँगवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत तीन वेळा कारवाई केली.

2018 पासून आनंदा जर्मनी व त्याचे साथीदार कारागृहात होते. जर्मनी हा 14 मे 2022 रोजी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याने गँगच्या माध्यमातून कारनामे सुरूच ठेवले आहेत. त्याने यापूर्वीही अनेकांना धमकावले आहे. या गँगकडून आणखी काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता आहे.

Back to top button