शिवसेनाविरुद्ध शिंदे गटातच लढतीचे चित्र | पुढारी

शिवसेनाविरुद्ध शिंदे गटातच लढतीचे चित्र

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आगामी लढती या शिवसेनाविरुद्ध शिंदे गटामध्ये होण्याची दाट चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहा आमदार निवडून दिले. दहापैकी सहा आमदार निवडून आल्याने साहजिकच कोल्हापूरला एक तरी मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती; पण कार्यकर्त्यांचा भ—मनिरास झाला. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांमध्ये नाराजी होतीच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आबिटकर वगळता अन्य पाच आमदार पराभूत झाले. यानंतर कोल्हापूर शहरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले; पण अन्य सेनेच्या माजी आमदारांचे पुनर्वसन झाले नाही. एवढेच काय, तर ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्याशी कधीही शिवसेना नेत्यांनी हितगुज केले नाही.

जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ज्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात तालुका व गावागावांत जाऊन आंदोलने केली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून एकाच व्यासपीठावर बसण्याची वेळ काही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर आली. यातील काही निष्ठावंतांनी शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून तो मान्यही केला. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. यानिमित्ताने काही शिवसैनिकांच्या मनातील खदखद बाहेर पडली. त्यामुळे जिल्ह्यात शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली.

शिवसेनेकडून चंदगड-आजरा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले संग्राम कुपेकर सध्या सेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत. स्थानिक पातळीवर नेत्यांची कुचंबणा होत असून, तेही नाराज असल्याची चर्चा आहे. करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके हेदेखील सेनेतील बंडानंतर शिवसेनेच्या आंदोलनात दिसले नाहीत. कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना नगरविकास खात्यातून मोठ्या प्रमाणात निधी दिला तसेच भविष्यातील राजकीय सोय म्हणून एकनाथ शिंदे गटात गेले. प्रकाश आबिटकरही त्याच मार्गाला गेले. शाहूवाडी, शिरोळ, कागलमधून शिंदे गटाच्या गळाला कोण लागणार, यासाठी चाचपणी सुरू आहे.

भाजप व ताराराणी आघाडी शिंदे गटाच्या मदतीला असणारच आहे. शिवसेनेला आता भाजपबरोबरच शिंदे गटाच्या उमेदवारालाही शह देण्यासाठी आपली ताकद वापरावी लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांतील लढतीचे चित्र हे शिवसेनाविरुद्ध शिंदे गट असण्याची शक्यता आहे.

Back to top button