कोल्हापूर : नुकसानभरपाईचा दावा दाखल करून पैसे लाटण्याचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : नुकसानभरपाईचा दावा दाखल करून पैसे लाटण्याचा प्रयत्न

मलकापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथे सन 2016 मध्ये जीप व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दोघेजण जखमी झाले होते. त्यांनी अपघातातील चालक व वाहक बदलून टाटा एलआयसी इन्शुरन्स कंपनी व इतरांविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करून पैसे लाटण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे अन्वेषण पथकाच्या तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वर्षा कावडे यांनी शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली.

याप्रकरणी तपास करणारे तत्कालीन पोलिस अंमलदार अशोक शिवाजी नवले (वय 40, सध्या नेमणूक देहू रोड पोलिस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालय, जि. पुणे), सुनील पांडुरंग यादव (37, रा. यादववाडी, शिरगाव), अशोक मारुती पाटील (40, रा. शिरगाव) संजय दत्तू शिंदे (40, रा. कडवेपैकी लाळेवाडी), पांडुरंग रामचंद्र यादव व अर्चना सुनील यादव (रा. यादववाडी, शिरगाव) यांच्याविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, अशोक नवले, सुनील यादव, अशोक पाटील, संजय शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांना शाहूवाडी-मलकापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. पाटील यांनी संशयितांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी : कोपार्डे येथे जीपला (एमएच 10 सी 2707) दुचाकीने (एमएच 09 ए एक्स 8226) धडक दिल्याने पांडुरंग यादव व त्यांची सून अर्चना सुनील यादव (रा.शिरगाव पैकी यादववाडी ता. शाहुवाडी) जखमी झाले होते. याचा तपास अशोक नवले यांनी केला होता. संशयित पांडुरंग यादव याच्या दुचाकीने (एमएच 09 ए एक्स 8226) जीपला ठोकरून अपघात झाला असताना त्याचा वाहन चालविण्याचा परवाना व दुचाकीचा इन्शुरन्स नसल्याने त्याने अपघाताची चौकशी अंमलदार नवले यांच्याकडे केली.

त्यांनी संगनमत करून अपघातामधील दुचाकी व चालक बदलून संशयित संजय दत्तू शिंदे (रा. लाळेवाडी) याच्या मालकीच्या दुचाकीचा (एमएच 09 डी वाय 5110) इन्शुरन्स असल्याने ती दुचाकी व संशयित पांडुरंग यादव याच्याऐवजी दुचाकीस्वार म्हणून अशोक मारुती पाटील (रा. शिरगाव) यास दाखवले. त्याच्याविरुद्ध त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. दरम्यान, यातील पांडुरंग यादव व त्यांची सून अर्चना यांनी अपघातामधील नुकसानभरपाई मिळावी म्हणून टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनी व इतरांविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर न्यायालयात दावा दाखल केला होता.

या दाव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीस संशय आल्याने त्यांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये न्यायाधीशांनी अपघाताची गुन्हे अन्वेषण विभागा मार्फत पडताळणी व चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे कोल्हापूर गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वर्षा कावडे यांच्या पथकाने दाव्याची चौकशी केली असता त्यात अपघातातील दुचाकी व चालक बदलल्याचे निष्पन्‍न झाले.

Back to top button