कोल्हापूर : ‘अतिक्रमण’ कारवाई रोखण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : ‘अतिक्रमण’ कारवाई रोखण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जागृती नगर हौसिंग सोसायटी ते अंबाई डिफेन्स रस्त्यावरील अतिक्रमण केलेली सहा झोपडीवजा बांधकामे महापालिकेने मंगळवारी हटविली. त्याला झोपडीधारकांनी प्रचंड विरोध केला. महापालिका अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. वादावादी व धक्‍काबुक्‍कीही झाली. कारवाई रोखण्यासाठी एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर कारवाई सुरू राहिल्याने प्रचंड तणाव होता.

या अनधिकृत बांधकामाबाबत जागृतीनगर हौसिंग सोसायटीमधील राजेंद्र कलकुटकी व इतर नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली होती.
महापालिका पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करताच झोपडपट्टीधारकांनी प्रचंड विरोध केला. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुदत द्यावी, अशी मागणी झोपडीधारकांकडून केली जात होती, मात्र अतिक्रमण असल्याने आणि रहदारीसाठी रस्ता रिकामा करणे आवश्यक असल्याने कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबीच्या आडवे येण्याचा प्रयत्न महिलांनी केला. पोलिसांनी सर्वांना बाजूला केले.
कारवाई सुरू असतानाच एका तरुणाने रॉकेल अंगावर ओतून घेतले. घर नाही तर जगून काय फायदा म्हणत काडीपेटी काढून पेटवून घेण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले.

सायंकाळी पाचपर्यंत कारवाई सुरू होती. ही कारवाई विभागीय कार्यालय क्र. 3, राजारामपुरी व अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता बाबुराव दबडे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, उमेश बागुल तसेच राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक आर. डी. ओंबासे यावेळी उपस्थित होते.

Back to top button