कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून प्लास्टिक बंदी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून प्लास्टिक बंदी

कोल्हापूर ; अनिल देशमुख : पर्याय निर्माण होईपर्यंत ‘सिंगल यूज प्लास्टिक’ निर्मूलनाची उत्पादकांवरच जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून (1 जुलै) प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, त्याद‍ृष्टीने उत्पादकांना उत्पादित केलेले प्लास्टिक जमा करून ते नष्ट करणे अथवा त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करावे लागणार आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने 1 जुलैपासून ‘सिंगल यूज प्लास्टिक’वर बंदी घातली आहे. याकरिता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ही नेमला आहे. या फोर्सद्वारे 10 जूनपर्यंत जिल्ह्यातील व्यापारी, वापर करणार्‍या विविध आस्थापना यांचे प्रबोधन करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात 26 दुकानांसह विविध आस्थापना सील करण्यात आल्या असून आजअखेर 1 लाख 25 हजारांचा दंडही वसूल केला आहे.

‘सिंगल यूज प्लास्टिक’बाबत सुमारे 600 उत्पादक आस्थापनांची पाहणी करण्यात आली. मात्र, जिल्ह्यात उत्पादन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात विक्री होणार्‍या उत्पादनांचे उत्पादन शेजारील गुजरातमध्ये होत आहे, त्या संबंधित उत्पादकांनाही याबाबत कळवण्यात आले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी सागितले.

प्लास्टिक बंदीबाबत अ‍ॅप विकसित केले आहे, त्याद्वारे दर 15 दिवसांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी नेमलेल्या नोडल अधिकार्‍यांना कारवाई, तपासणी याबाबतची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे.

तपासणीचे ‘जिओ टॅगिंग’ होणार

प्लास्टिकबाबत केल्या जाणार्‍या तपासणीचा आता फार्स चालणार नाही. ज्या ठिकाणी तपासणी केली, त्याचे संबधित तपासणी अधिकार्‍यांना ‘जिओ टॅगिंग’ करावे लागणार आहे. यामुळे तपासण्या कुठे झाल्या, कोणाच्या झाल्या, हे स्पष्ट होणार आहे.

उत्पादक, विक्रेत्यांचा उत्पादनांवर शिक्‍का

‘सिंगल यूज प्लास्टिक’वर संबंधित उत्पादक, विक्रेत्यांचा शिक्‍का राहणार आहे. उत्पादन किमतीत एक-दोन रुपये जादा समाविष्ट केले जातील आणि वापरानंतर हे प्लास्टिक परत केल्यानंतर ही रक्‍कम परत देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, इतरत्र प्लास्टिक आढळले, तर संबंधित उत्पादक, विक्रेत्यांवरही कारवाई करण्याचा विचार सुरू आहे.

बोगस उत्पादनांना बसणार आळा

नोंदणी न करता, परवाने न करता अनेक उद्योग सुरू आहेत. त्यामध्ये शुद्ध पाण्याचा धंदा, बिस्कीटसह अन्य पदार्थ विक्रीचा धंदा तेजीत आहे. आता प्लास्टिक उत्पादन वापरणार्‍यांना त्यांचा शिक्‍का मारण्यासह भविष्यात रजिस्टर ठेवून वार्षिक अहवालही सादर करावा लागणार आहे. त्याद्वारे वर्षभर किती उत्पादन केले, विक्री केली, त्याद्वारे किती पुन्हा जमा झाले, त्याचे काय केले, यावरही नियंत्रण ठेवले जाणार आहे. यामुळे बोगस उत्पादनांना आळा बसणार आहे.

Back to top button