गोकुळ संघ शेतकर्‍यांचा आत्मा : पालकमंत्री सतेज पाटील | पुढारी

गोकुळ संघ शेतकर्‍यांचा आत्मा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : गोकुळ हा शेतकर्‍याचा आत्मा आहे. तो सुद‍ृढ राहिला तर जिल्हा सुद‍ृढ राहणार आहे. त्यामुळे गोकुळ सुद‍ृढ ठेवण्यासाठी पुढील 25 वर्षांचा विचार करून गोकुळच्या विकासाचे नियोजन करत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. स्पर्धेत टिकण्यासाठी 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी साथ द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गेाकुळ) वतीने आज ‘गोकुळ श्री’ पुरस्कारांचे वितरण व गुणवंत कामगार, उत्कृष्ट खेळाडू, दूध वितरकांचा गौरव मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. मार्केट यार्ड येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये हा कार्यक्रम झाला.

ना. पाटील म्हणाले, स्पर्धेत टिकायचे असेल नवीन संकल्पना घेऊन आपणही दूध उत्पादक शेतकर्‍यांकडे गेले पाहिजे. दूध संकलन वाढविले पाहिजे. त्यासाठी दूध उत्पादकांच्या संख्येत वाढ केली पाहिजे. तरच 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट आपण पार करू. खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोकुळला वैभव प्राप्‍त करून देण्यासाठी सभासदभिमुख कारभार करण्याचा व प्रत्येक सभासदाला न्याय देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील.

ना. मुश्रीफ म्हणाले, दूध उत्पादक शेतकरी हाच खरा गोकुळचा मानकरी आहे. गोकुळ वैभव आहे ते टिकले पाहिजे. भविष्यात अमूलबरोबर आपल्याला स्पर्धा करावयाची आहे. गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. आपण ती पुरी करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे दुधाचा पुरवठा करावयाचा झाल्यास दूध संकलनामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. 20 लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दूध उत्पादकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी गोकुळच्या वतीने दूध उत्पादकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमात पूजा बाळासो घुगरे, विजय विठ्ठल दळवी, मानसी राजेंद्र चौगले, शांताराम साठे, हुंबगोंडा बापू पाटील यांना ‘गोकुळ श्री’ पुरस्कार देण्यात आला. तुकाराम पाटील (कोगे, करवीर), सुभाष पाटील (अतिग्रे, ता. हातकणंगले) व सयाजी निकम (बांबवडे) या गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, बयाजी शेळके, अंबरिष घाटगे, डॉ. सुजित मिणचेकर, रणजितसिंह पाटील, अभिजित तायशेटे आदी उपस्थित होते. आभार शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले.

Back to top button