कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाच शाळाच ‘आदर्श’ | पुढारी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाच शाळाच ‘आदर्श’

कोल्हापूर ; पूनम देशमुख : दोन वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच बुधवारी शाळा सुरू झाल्या. अलीकडच्या काळात महानगरपालिकेच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडत असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी या शाळांना पालकांची पसंती मिळत आहे. मात्र, यातही मनपाच्या 58 शाळांपैकी केवळ पाचच शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत आहे. त्यामुळे या शाळा आदर्श ठरल्या आहेत.

मागील कित्येक वर्षांपासून प्रथम पाच क्रमांकांच्या शाळांचाच विकास झाला आहे. अन्य शाळा अद्याप मुलांच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच शाळांचा दर्जा सुधारणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

जरगनगर विद्यामंदिर, टेंबलाईवाडी विद्यामंदिर, महात्मा फुले विद्यालय, वीर कक्कय्या विद्यालय, जवाहरनगर या शाळांचा मनपाच्या आदर्शवत पहिल्या पाच शाळांमध्येे सहभाग आहे. मनपा शिष्यवृत्ती परीक्षेचा पॅटर्न, सेमी इंग्लिशची सुविधा, विविध परीक्षांत यशाचा उंचावणारा आलेख, यामुळे पालिकेच्या या शाळांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून, महिनाअखेर मनपा शाळांतील विद्यार्थीसंख्येचा एकूण अहवाल प्राप्त होईल, असे डी. सी. कुंभार, मनपा प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी यांनी सांगितले.

शहरात सध्या महानगरपालिकेंतर्गत 58 शाळा असून, यामध्ये 15 शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या आहेत. तर 3 शाळा सेमी इंग्रजी माध्यमाकरिता प्रस्तावित आहेत. या शाळांमध्ये 380 शिक्षकांची नेमणूक असून, यात महिला शिक्षकांचे प्रमाण 60 टक्के, तर पुरुष शिक्षकांचे प्रमाण हे 40 टक्के आहे. प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नेमणूक असायला हवी. असे असताना काही ठराविक शाळांत हा नियम लागू पडतो, तर काही ठिकाणी या नियमांचा सोयींनी विसर पडलेला दिसून येतो.

निकषापेक्षा 2 विद्यार्थी कमीच!

शाळेत विद्यार्थी पटसंख्या आणि शिक्षकसंख्या किती असावी यासंदर्भात शिक्षण पद्धतीत नियम करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, मनपा शाळांची आजची स्िथती पाहता काही मोजक्याच शाळांबाहेर प्रवेश फुल्लचे फलक लागल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांना पायपीट करावी लागत आहे.

Back to top button