लसीकरण मोहिम : कोल्हापूर जिल्ह्यात २० लाखांचा टप्पा पार | पुढारी

लसीकरण मोहिम : कोल्हापूर जिल्ह्यात २० लाखांचा टप्पा पार

कोल्हापूर : विकास कांबळे : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने बुधवारी 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना पहिला डोस देण्यात आला आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आल्याने या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती आली आहे. लसीकरणामध्ये करवीर व भुदरगड तालुका आघाडीवर आहे. राहिलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी अद्यापही जिल्ह्याला 41 लाख डोसची आवश्यकता आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

लसीच्या उपलब्धतेबाबत निश्‍चित खात्री नसल्यामुळे सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांची माहिती संकलित करण्यात आली. यामध्ये 38 हजार 256 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सची संख्या 29 हजार 821 होती. लसीकरण मोहिमेत प्रत्यक्षात याच्यापेक्षा अधिक कर्मचार्‍यांनी पहिला डोस घेतला आहे.

लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लसींचा पुरवठा नियमित होता. त्यानंतर मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागला. अशा परिस्थितीत मे महिन्यात 45 वर्षांवरील नागरिकांनंतर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, अपुर्‍या लसीमुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ होऊ लागल्याने 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आठ दिवसांतच थांबवावे लागले. 45 वर्षांवरील नागरिकांची गर्दी कमी होऊ लागल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

करवीर तालुका आघाडीवर

जिल्ह्यात लसीकरणाचा 20 लाखांचा टप्पा पूर्ण झाला. आजअखेर 20,48,487 नागरिकांना लस देण्यात आली. त्यापैकी 13,32,879 नागरिकांनी पहिला, तर 7,15, 608 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरणामध्ये करवीर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातील 2,91,933 नागरिकांनी पहिला, तर 1,82,436 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Back to top button