कोल्हापूर : सोळा मुलांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया | पुढारी

कोल्हापूर : सोळा मुलांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सहा वर्षांपर्यंतच्या 16 मुलांवर मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याकरिता या मुलांना जिल्हा परिषदेच्या वतीने मुंबईला स्वतंत्र बसमधून पाठविण्यात आले. या मुलांची व त्यांच्यासोबत असणार्‍या पालकांचा मोफत प्रवास, भोजन, निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनवेळा तर शालेय विद्यार्थ्यांची तपासणी वर्षातून एकदा केली जाते. यामध्ये हृदयरोग तसेच अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते.

अंगणवाडी सेविका, आशा यांच्या मदतीने रुग्णांची यादी तयार केली जाते. हृदयरोग संशयित बालकांसाठी 2 डी इको शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 16 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बसमध्ये बसताना मुलांच्या पालकांनी दोन्ही हात जोडून प्रशासनाचे आभार मानले.

या शस्त्रक्रियांकरिता सुमारे 20 लाख इतका खर्च येणार असून तो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मिळणार्‍या अनुदानातून करण्यात येणार आहे. चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही बस सोडण्यात आली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही बालके मुंबई येथे रुग्णालयात दाखल झाली.

Back to top button