कोल्हापूर : चला कोल्हापुरातून डेंग्यूला हद्दपार करूया! | पुढारी

कोल्हापूर : चला कोल्हापुरातून डेंग्यूला हद्दपार करूया!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी : कोल्हापुरात कोरोनापाठोपाठ डेंग्यूने सार्वजनिक आरोग्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. स्वच्छ पाण्यात निर्माण होणार्‍या या डासांची मोठी पैदास झाल्यामुळे घराघरांत डेंग्यूचे रुग्ण आहेत आणि रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढते आहे. या वाढत्या साथीवर आरोग्य व्यवस्थेला दोष देत बसण्याऐवजी लोकसहभागातून डेंग्यूला हद्दपार करता येणे शक्य आहे.

यामुळे कोल्हापूरकरांनी डेंग्यूच्या साथीला हद्दपार करण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. नागरिकांनी सजगतेने आठवड्यातून केवळ 10-15 मिनिटे आपला वेळ खर्ची टाकला, तर साथ रोगाच्या मुकाबल्यात एक नवा कोल्हापूर पॅटर्न उभा करता येणे शक्य आहे.

गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात मलेरियाचा आलेख उतरणीला लागला. मात्र, डेंग्यू, चिकुनगुनिया या दोन रोगांनी मात्र सार्वजनिक आरोग्याचे क्षेत्र हादरवून सोडले आहे. बघताबघता साधा वाटणारा ताप नागरिकांना मुरगळून टाकतो आणि रक्तातील रोगप्रतिकारक पेशी झपाट्याने खाली आल्याने रुग्ण अस्वस्थ होतात. मग या गंभीर रुग्णांना दवाखान्यात हलविण्याशिवाय पर्याय रहात नाही. तेथे रुग्णांना प्लेटलेटस्च्या पिशव्या आणि प्रसंगी सिंगल डोनर प्लेटलेटस् चढविल्या जातात.

या उपचाराचा खर्च महाग असतो आणि साहजिकच रुग्णाच्या डिस्चार्जवेळी नातेवाईकांच्या हातात चाळीस ते पन्नास हजारांचे बिल पडते. हा रोग संसर्गजन्य आहे. डेंग्यूबाधित रुग्णाचा चावा घेतलेला डास सामान्य माणसाला चावला, तर त्यालाही डेंग्यूची बाधा होते. त्यामुळे अलीकडे डासांच्या या उपद्रवाने गल्ली-मोहल्ल्यांमध्ये कुटुंबेच्या कुटुंबे डेंग्यू, चिकुणगुनियाने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

या साथीला हद्दपार करण्यासाठी डास नष्ट करणे, त्यांची उत्पत्ती स्थाने उद्ध्वस्त करणे आणि ताप येताच रक्ताची तपासणी करून घेणे या गोष्टी केल्या, तर समाजाची या गंभीर समस्येपासून सुटका होऊ शकते; पण दुर्दैवाने ज्याच्या घरात रुग्ण ते अख्खे कुटुंब कण्हते. परंतु, शेजारी मात्र सावध होत नाहीत. या समन्वयाच्या आणि एकजुटीच्या अभावामुळे सध्या कोल्हापुरात डासांचे फावले आहे. त्याचा बिमोड करावयाचा असेल, तर डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.

डेंग्यू हा रोग अ‍ॅनाफॅलिस या प्रजातीच्या डासांपासून होतो. या डासाची मादी प्रामुख्याने स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते. अंडीतून अळ्यांचे कोष आणि कोषातून डास हे जीवनचक्र अवघ्या 15 दिवसांचे आहे. यामुळेच हे जीवनचक्र मोडण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराभोवती अस्वच्छ पाण्याचे साठे राहणार नाहीत, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पावसाळ्यात असे साठे मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.

घरामध्ये वा सभोवताली असलेली फुटकी भांडी, नारळाच्या करवंट्या, निरुपयोेगी टायर्स, इतकेच काय घरातील रेफ्रिजरेटरमधून पाणी बाहेर पडण्यासाठी केलेल्या व्यवस्थेजवळही या डासांच्या अळ्या आढळून येतात. त्याहीपेक्षा वस्त्यांमध्ये असलेली अर्धवट बांधकामे तळघरे यामध्ये साचलेले पाणी ही तर या डासांची उगमस्थाने असतात. तेथूनच साथ पसरते आणि अख्ख्या नागरी वस्त्यांना आपल्या कवेत घेते.

कोल्हापूर मध्ये अशी असंख्य अर्धवट स्वरूपाची बांधकामे आहेत. शिवाय, विनावापर पडून असलेल्या तळघरांची संख्या काही कमी नाही. पाणी येते या सबबीखाली नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होते आणि आज हे दुर्लक्षच नागरिकांच्या जीवावर उठले आहे.

ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर संबंधित ठिकाणांवरील स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करणे सहज शक्य आहे. आठवड्यातून केवळ 15 ते 20 मिनिटे त्यासाठी पुरेशी ठरतात. पण पुढाकार कोण घेणार ? असा प्रश्न उपस्थित होतो. यासाठी आता डेंग्यूला हद्दपार करण्याकरिता लोकचळवळ उभी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संघर्ष ही जीवनशैली बनलेल्या कोल्हापूरकरांसाठी नेमकी हीच खरी संधी आहे.

Back to top button